
नांदेड – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावी परीक्षेत गुरुवारी केमिस्ट्री विषयाचा पेपर होता या पेपरमध्ये कंधार तालुक्यातील बोरीखु येथे श्री बालाजी उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रावर कॉपी करणाऱ्या १२ परीक्षार्थींना पकडण्यात आले. या केंद्रावर २८६ परीक्षार्थी होते. त्यातील पाच परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. २८१ परीक्षार्थींनी येथे परीक्षा दिली. उपशिक्षणाधिकारी शेटकार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे बारावी परीक्षेत आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १६ कॉपी केस आढळल्या आहेत.
जिल्ह्यातील १०७ केंद्रावर इयत्ता बारावीची ११ फेब्रुवारीपासून परीक्षा होत आहे. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी विविध भरारी पथक, बैठे पथक स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षेसाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी हे केंद्रांना भेट देत आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचा समावेश आहे त्याचवेळी शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकेही केंद्रांना भेट देऊन कॉपी रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
गुरुवार २० फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात केमिस्ट्री विषयाच्या पेपर होता. या पेपरमध्ये कंधार तालुक्यातील बोरी खु. येथील श्री बालाजी उच्च माध्यमिक विद्यालय या केंद्रावर १२ परीक्षार्थींना कॉपी करताना पकडण्यात आले. उपशिक्षणाधिकारी शेटकार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जिल्ह्यात गुरुवारी २२ हजार ९२९ विद्यार्थ्यांपकी २२ हजार ६३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली २९३ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
आजपासून दहावी परीक्षांना प्रारंभ…जिल्ह्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात १७२ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले असून या केंद्रावर ४७ हजार ९३४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावी परीक्षेत एकूण ३२ केंद्र हे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दहा विशेष भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत. तर तालुकास्तरावर दोन भरारी पथक कार्यरत राहतील. जिल्ह्यात असलेल्या ३२ संवेदनशील केंद्रावर भेटी देण्यासाठी सात विशेष पथकही नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षेसाठी १७२ बैठे पथकही राहणार आहेत.