प्रशासकीय

नांदेडला विभागीय आयुक्तालय होऊ शकते; इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता नाही – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण 

महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ; प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे - अपर मुख्य सचिव राजेश कुमार

नांदेड – महसूल विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धा नांदेडमध्ये होत आहेत. विभागस्तर सोडून नांदेडमध्ये या स्पर्धा होत आहेत. ही बाब लक्षात घेता नांदेडला विभागीय आयुक्तालय होऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे. विभागीय आयुक्तालयासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर नांदेडमध्ये उपलब्ध आहे, असे स्पष्टपणे नमूद करत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेडच्या विभागीय आयुक्तालयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे राज्याच्या महसूल विभागाचे मुख्य सचिव नांदेडमध्ये असताना त्यांनी ही बाब अधोरेखित केली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज शुक्रवारी नांदेडमध्ये या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नसले तरीही महसूल आयुक्तालयाचा प्रश्न त्यांच्या मागील नांदेड दौऱ्यात उपस्थित करण्यात आला होता. या विषयावरील प्रश्नाला बावनकुळे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे महसूल आयुक्तालयाच्या प्रश्नाला पुन्हा एकदा अशोकराव चव्हाण यांनी गती दिली असल्याचे स्पष्ट होत आहे.

महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे शानदार राजवैभवी उद्घाटन नांदेडमध्ये शुक्रवारी श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियमवर करण्यात आले. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार हे होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी उद्घाटनपर भाषणात महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या सर्व क्षेत्रातील वाटचालीबद्दल गौरोद्गार काढले. विभाग स्तरावर सातत्याने होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धा आता नांदेडला होत आहेत जिल्हास्तरावर पहिल्यांदाच राज्यस्तरीय स्पर्धा होत असताना नांदेडला उपलब्ध असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी नांदेडला आता विभागीय आयुक्तालय होऊ शकते, असे स्पष्ट सांगितले. नांदेड येथील श्री गुरुगोविंद सिंघजी स्टेडियमवर या स्पर्धा होत आहेत. हे स्टेडियम फक्त खेळासाठीच वापरले जात आहे. या मैदानाचा वापर आता कोणत्याही राजकीय सभा व इतर कारणांसाठी केला जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. नांदेडहून गेलेले अधिकारी राज्यात वरिष्ठ पदावर जात आहेत. त्यामुळे नांदेडची अधिकाऱ्यांची निवड ही चांगली असल्याचे ते म्हणाले. महसूल स्पर्धेला निधी उपलब्ध करून देण्यास मुख्य सचिवांचा एक शब्द पुरेसा असल्याचेही ते म्हणाले. कर्मचाऱ्यांवरील ताण तणाव हलका करण्यामध्ये क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उपयोगी पडत असल्याचे सांगितले. तत्पूर्वी त्यांनी ध्वजारोहण केले. तसेच खेळाडुंना शिस्त व सांघिक भावनेची शपथ दिली.

याप्रसंगी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नांदेडच्या श्री गुरुगोविंद सिंग जी स्टेडियम साठी ४४२ कोटींच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असल्याचे सांगितले. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण आणि आपण मिळून प्रयत्न करू असेही आश्वासित केले. अशोकरावांच्या काळात विकसित झालेल्या या स्टेडियमची आज दशा झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या महसूल स्पर्धांसाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्यासाठी विधिमंडळात सर्व आमदार प्रयत्न करू असे सांगितले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे या निधीची मागणी करू असेही सांगितले. खासदार रविंद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंद तिडके, आमदार बालाजी कल्याणकर यांनी शुभेच्छापर संबोधन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे प्रतिनिधी पोपंटवार, महाराष्ट्र राज्य नायब तहसिलदार संघटनेचे अध्यक्ष किरण अंबेकर, महाराष्ट्र राजपत्रित संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सचिन खल्लाळ, महाराष्ट्र राज्य अप्पर जिल्हाधिकारी संवर्गाचे प्रतिनिधी दिपाली मोतियाळे यांनीही संबोधित केले.

यावेळी “अविरत महसूल” या राज्यस्तरीय स्मरणिकेचे अनावर करण्यात आले. राज्यातील जवळपास अडीच हजार कर्मचारी या स्पर्धेनिमित्त नांदेडमध्ये आले आहेत. पुढील तीन दिवस ही स्पर्धा नांदेड येथे रंगणार असून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. महसूलच्या विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत नांदेडमध्ये संपन्न होत आहेत. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप गावडे, निवृत्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जीएसटीचे सहआयुक्त अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर आयुक्त महसूल नैना बोंदार्डे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, अपर आयुक्त प्रदिप कुलकर्णी, नितीन महाजन, सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे – अपर मुख्य सचिव राजेश कुमार…कोणत्याही राज्याची, जिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरते. राज्याचे प्रशासन कसे आहे हे महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रम, वृत्ती व सचोटीवर ठरते. महसूल कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे व दर्जेदार कामांमुळे देशात महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये केले. राजेशकुमार यांनी बारा वर्षानंतर या स्पर्धांचे आयोजन होत असल्याचा आनंद व्यक्त केला. या स्पर्धांचे नियोजन करणारे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, यांनी दर्जेदार स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी कौतूक केले. नांदेडमध्ये असणाऱ्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, निवासाची व्यवस्था यामुळे याठिकाणी केवळ महसूलच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा असतो. यामुळे या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी दर्जेदारच असतात मात्र फायलींमध्ये प्रशासनाचे कसब दाखवणारे आता मैदानावर आपले प्राविण्य दाखविणार असल्याचा आनंद आहे. अगदी शिपाईपासून तर अप्पर मुख्य सचिवांपर्यंत आम्ही सगळे मैदानावर एक होऊन खेळतो. ही आमची एकजूट महसूलला वेगळी बळकटी देत असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!