
नांदेड – पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर चांगले काहीतरी करून दाखविण्याच्या भावनेने प्रेरीत झालेल्या आ.श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या रोजगार मेळाव्यात रोजगाराचा जणू आज शनिवारी अर्धापूर येथे महाकुंभच भरला होता. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील साडेसहा हजार बेरोजगार युवक-युवतींनी या महाकुंभात आपला सहभाग नोंदविला. त्यातील तब्बल दीड हजार जणांची विविध पदांसाठी निवड करण्यात आली. हा रोजगार मेळावा हा नांदेड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला आहे.
अर्धापूर येथे दि.२२ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आ.श्रीजया चव्हाण यांनी आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी आ.श्रीजया चव्हाण व त्यांची टीम मागील दोन महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेत होती. त्याचीच फलश्रुती म्हणून हा भव्यदिव्य रोजगार मेळावा संपन्न झाला. पुणे, मुंबईला लाजवेल अशी कॉर्पेरेट व्यवस्था पाहून विविध कंपन्यांचे अधिकारी यांच्यासह प्रमुख पाहुणेसुध्दा या व्यवस्थेवर प्रभावित झाले. या मेळाव्यात मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, नागपूर, हैद्राबाद, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आदी ठिकाणच्या नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, किया मोटर्स, केन्स टेक्नॉलॉजी, एसबीआय लाईफ, आयसीआयसीआय, टाटा मोटर्स, एमआरएफ टायर्स, हायर, फियाट, बजाज इलेक्ट्रिकल्स, फिनोलेक्स केबल, कोरोमंडल फायनान्स, तिरूमला ग्रुप, इंडूरन्स ग्रुप, एल ॲण्ड टी, सायबेरोथॉन आदी नामांकित कंपन्यांचा सहभाग होता.
या सर्व कंपन्यांतील विविध पदांसाठी ६ हजार ५०० पेक्षा अधिक युवक, युवतींनी मुलाखती दिल्या. त्यातील दीड हजार बेरोजगारांची विविध पदांवर निवड करण्यात आली. एखाद्या रोजगार मेळाव्यातील ही निवड संख्या मोठी मानली जाते. त्यामुळे रोजगाराचा अर्धापूरमध्ये भरला महाकुंभ असेच म्हणावे लागेल.