
नांदेड – नांदेड जिल्हा पुरवठा अधिकारीपदी ८ जून २०२३ पासून कार्यरत असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली चौगुले यांची राज्य शासनाने नांदेडहून उचलबांगडी केली आहे. नांदेडचा पदभार सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. बारदेवाड यांनी या पदाचा तात्काळ अतिरिक्त कार्यभार स्वीकार स्वीकारावा असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा पुरवठा अधिकारी पदी कार्यरत असलेल्या रूपाली चौगुले यांच्या कार्यपद्धती विषयी जिल्ह्यात अनेक तक्रारी होत्या. स्वस्त धान्य दुकानदारांकडूनही मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यपद्धतीबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या. प्रशासकीय पातळीवरही त्यांच्याबाबत नकारात्मक सूर होता. प्रशासकीय पातळीवरून निवडणूक कालावधीत रूपाली चौगुले यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याबाबतही हालचाली सुरू होत्या. या सर्व परिस्थितीत रूपाली चौगुले यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश लिंगन्ना बारदेवाड यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कारभार राहणार आहे. हे आदेश तातडीने अंमलात आणण्याबाबतही आदेशित करण्यात आले आहे. राज्याचे सहसचिव अशोक आत्राम यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत.
नांदेडमध्ये आता अधिकारी बदलाचे सत्र सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. दोन दिवसांपूर्वीच निवासी जिल्हाधिक उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची बदली करण्यात आली आहे. ते आपल्या बदली विरोधात मॅटमध्ये गेले आहेत. यापुढे आता बदलीचा नंबर कोणाचा याकडेही लक्ष लागले आहे. सत्ता बदलानंतर आता जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला वेग आला आहे.