
नांदेड – परभणी आणि नांदेड जिल्ह्यात प्रशासनातले मॅनेजमेंट गुरु म्हणून परिचित झालेले निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी एक वर्षाआधीच बदली करण्यात आली आहे. त्यांना नांदेडमध्येच रोहयो उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नांदेडचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून गोंदियाचे निवडणूक उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदेड निवासी उपजिल्हाधिकारी पदावर १३ जून २०२५ रोजी दोन वर्षे पूर्ण करणारे आणि निवासी उपजिल्हाधिकारी पदाची खुर्ची कशी कुस्ती करून मिळवली याचे सुरेल वर्णन करणारे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर दिवाळी पहाट या कार्यक्रमात चर्चेत आले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पदाची खुर्ची मिळवण्यासाठी कुस्ती कशी रंगली होती, याबाबतचा किस्सा सार्वजनिक ठिकाणी सांगितल्यामुळे थेट नाराजीही व्यक्त केली होती. तसेच नांदेडकरांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
नांदेड येथे तहसीलदार पदावर कार्यरत असलेले किरण अंबेकर हे पदोन्नतीवर विदर्भात बदलीवर गेले होते. तेथील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना नांदेडमध्ये आणण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना आता यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच अंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील बदली प्रक्रिया आता पुन्हा शिवाजीनगरातील मर्जीप्रमाणेच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात बदल्यांमध्ये असलेले बालाजी पर्व आता थंडावले आहे. ही बाबही आता स्पष्टपणे अधोरेखित होत आहे.
नूतन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी वडदकर यांचे गुणसूत्र जुळू शकले नसल्याची चर्चाही गेल्या काही दिवसापासून होती. नुकत्याच झालेल्या तलाठी बदली प्रकरणातही वादाला तोंड फुटले होते. काही दिवसापूर्वीच त्यांचे एक स्वीय सहकारी तथा नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांची थेट हिमायतनगर येथे बदली झाली. गेल्या काही दिवसापासून वडदकर यांच्या बदलीचीही चर्चा सुरू होती. अखेर या बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यांना नांदेड उपजिल्हाधिकारी रोहयो या पदावर नेमणूक देण्यात आली आहे. एक जुलै रोजी त्यांना या पदावर रुजू होण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्याचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत.
पण त्याचवेळी वडदकर यांनी नांदेड जिल्ह्यात महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा घेऊन नांदेडचा मोठा नावलौकिक केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या महसूलच्या सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ‘शासन आपल्या दारी’, शिवगर्जना हे महानाट्य तसेच इतर अनेक उपक्रमांतर्गतही त्यांनी जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देत शासनाचे कार्यक्रम यशस्वी केले होते.



