
नांदेड – जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आता अधिक गती घेत असून या अवैध वाळू माफियांवर बुधवारी सकाळी पोलीस दल आणि महसूल विभागाने संयुक्तरित्या कारवाई केली. नांदेड ग्रामीण आणि लिंबगाव पोलीस ठाणे हद्दीतील विष्णूपुरी, थूगाव, कल्हाळ या भागातून ६ इंजिनसह तब्बल २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अनेक कारवाया झाल्यानंतरही वाळू उपसा पुन्हा सुरू होतच असल्याने या भागातील वाळू माफिया किती सरावलेले आहेत हे स्पष्ट होत आहे. लिंबगाव ठाणे हद्दीतील अवैध वाळू उपसा सुरू असताना कारवाईकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी लिंबगावच्या ठाणे प्रमुखांना तडकाफडकी बदलले. लिंबगावला नवे ठाणेप्रमुख येताच २६ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपासूनच अवैध वाळू माफियांवर कारवाई सुरू केली. दुपारी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत लिंबगावसह नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतूनही अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठीचे सहा इंजिन आणि इतर साहित्य असा एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड ग्रामीण व लिंबगाव हद्दीत विष्णुपुरी, थुगाव, कल्लाळ या भागात पोलीस व महसूलच्या संयुक्त पथकाने सदर ठिकाणी छापा मारून ही कारवाई केली आहे. याप्रकरणात नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
लिंबगाव ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध वाळू उपसाबाबत स्थानिकांनी पोलीस आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र कारवाई झाली नव्हती. अखेर ठाणेप्रमुख बदलताच कारवाई करण्यात आली ही उल्लेखनीय बाब आहे. जिल्ह्यात अवैध वाळू उपसा थांबण्याची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आता पोलीस व महसूल विभाग वाळूमाफियांविरूध्द कारवाईची तीव्रता आणखी किती वाढवते याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा सुशिलकुमार नायक, लिंबगावचे सपोनि पंढरी बोधनकर पोकॉ घुन्नर, पोहेकॉ टाक, चालक पोकॉसोनकांबळे, नायब तहसीलदार स्वप्निल दिघलवाड, काशिनाथ डांगे, मंडळ निरीक्षक कुणाल जगताप, राजेंद्र शिंदे, तलाठी संजय खेडेकर, विजय रणविरकर, माधव भिसे, उमाकांत भांगे, संताजी देवापूरकर, गिरी, मनोज सप्रे, बिद्राळे, मनोज जाधव यांनी कारवाई केली. या कारवाईबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अभिनंदन केले. तसेच अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर भविष्यात अजून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.