
नांदेड- नांदेड येथे कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराच्या यंदाच्या मानकऱ्यांची घोषणा झाली असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानासाठी जीवनगौरव, तर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, अभिनेते संदीप पाठक, पत्रकार राहुल कुलकर्णी व पोटविकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांना स्मृती पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी रविवारी दिली.
माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दैनिक सत्यप्रभाच्या वतीने मागील २१ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा १४ जुलै रोजी दु. ३.१५ वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड येथे होणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असून, राज्यपाल झाल्यानंतर ते प्रथमच नांदेड शहरात येत आहेत. त्यांचाही यावेळी नांदेडकरांच्या वतीने गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण तर अतिथी म्हणून आ. बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव पाटील तिडके बोंढारकर व आ. श्रीजया चव्हाण उपस्थित राहतील.
कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांच्या यंदाच्या मानकऱ्यांची निवड खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केली आहे. या समितीत माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, लातूरचे वरिष्ठ पत्रकार धर्मराज हल्लाळे व हिंगोली येथील ओमप्रकाश देवडा अर्बन बँकेचे अध्यक्ष सुनिल देवडा यांचा समावेश होता. येत्या सोमवारी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, संपादक शिवानंद महाजन, संचालक बालाजी जाधव, संदीप पाटील व सल्लागार मनोहर आयलाने यांनी केले आहे.