
नांदेड – किनवट तालुक्यातील दोन तलाठी महिला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडलेली असतानाच आणखी एक कंत्राटी महिला प्रकल्प अधिकारी नांदेडमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडली आहे. नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कंत्राटी प्रकल्प अधिकारी सुजाता मधुकरराव पोहरेला गुरुवारी १५ हजार रुपयांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर केलेल्या तपासणीत पोहरेकडे रोख ५० हजार रुपयेही आढळून आले आहेत. हडको येथील घराची झडतीही आता सुरू करण्यात आली आहे.
एका तक्रारदार महिलेने आपल्या मुलाचा ऑनलाईन अर्ज जिल्हा जात पडताळणी समितीकडे सादर केला होता. त्यांनी १३ मार्च रोजी ऑफलाइन अर्जदेखील दाखल केला होता; परंतु काही तांत्रिक कारणास्तव तो अर्ज नामंजूर करण्यात आला. पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केला आणि तक्रारदार महिलेने बार्टीच्या कंत्राटी जिल्हा प्रकल्प अधिकारी, समतादूत सुजाता मधुकरराव पोहरेची भेट घेतली. त्यावेळी पोहरेनी ‘मी काम करीत असलेल्या विभागाच्या शेजारीच जात पडताळणी विभागाचे कामकाज चालते. या कार्यालयात माझी ओळख आहे. मी तुझे काम करून देते; परंतु पैसे भरल्याशिवाय काम होणार नाही. तुम्ही २० हजार रुपये टोकन रक्कम दिल्यास तुमचे काम होईल, अन्यथा जात पडताळणीचे काम होणार नाही असे पोहरे यांनी स्पष्ट केले. याबाबत तक्रारदार महिलेने २६ जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
या तक्रारीनंतर ३ जुलै रोजी विशेष समाज कल्याण कार्यालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था येथील प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरेच्या कक्षातच पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यावेळी सुजाता पोहरेने तक्रारदार महिलेच्या मुलाची अनुसूचित जातीची जात पडताळणी होऊन जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपये लाच मागणी केली होती. तडजोडीअंती सुरुवातीला १५ हजार रुपये आणि उर्वरित रक्कम १५ हजार रुपये जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम पूर्ण झाल्यानंतर द्यावे लागतील असे स्पष्ट केले. या सर्व प्रकारानंतर ३ जुलै रोजी बार्टीच्या कार्यालयात सुजाता पोहरेने तक्रारदार महिलेकडून १५ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वतः स्वीकारली.
या कारवाईनंतर पोलिसांनी पोहरेची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे रोख ५० हजार रुपयांसह एक मोबाईल आढळून आला. त्यांचा मोबाईल पोलिसांनी तपास कामासाठी ताब्यात घेतला आहे. या प्रकारानंतर सुजाता पोहरेच्या हडको येथील घराची झडतीही सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी पोहरेविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक करीम खान पठाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या कारवाईत महिला पोहेकॉ मेनका पवार, पोकॉ यशवंत दाबनवाड, ईश्वर जाधव, पोहेकॉ रमेश नामपल्ली यांचा सहभाग होता.