प्रशासकीय

वाढत्या उष्णतेमुळे नांदेड जिल्ह्यात शाळांची वेळ आणखी कमी

सकाळी सात ते सव्वा अकरा वाजेपर्यंत प्राथमिक तर दुपारी पावणे बारा वाजेपर्यंत माध्यमिक शाळा सुरू राहणार

नांदेड – उन्हाळ्यामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र नांदेड जिल्ह्यात वाढत्या उष्णतेची खबरदारी घेत सहा मार्चपासूनच शाळा सकाळच्या सत्रात चालविल्या जात आहेत. जिल्ह्यात सकाळी साडेआठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शाळा सुरू होत्या. आता राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार सकाळी सात ते दुपारी पावणे बारा वाजेपर्यंत शाळा भरवण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांची वेळ आणखी कमी झाल्याचेच स्पष्ट झाले आहे.

राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी सकाळ सत्रात शाळा भरविणेबाबत आदेश निर्गमित झाले आहेत. राज्यात सर्व शाळेचे वेळापत्रक संदर्भीय पत्रान्वये निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक, शाळेची वेळ यामध्ये एकवाक्यता असणे आवश्यक असल्याचे सदरील पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सदर बाब विचारात घेता, संदर्भीय पत्रान्वये नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी ७ ते ११.१५ व माध्यमिक शाळांसाठी ७ ते ११.४५ अशी करण्यात आली आहे.

उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी काही सूचनाही विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उन्हाळयात विद्यार्थ्यांनी मैदानी/शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करणे, उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे. उन्हात बाहेर पडण्यास टाळावे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

उन्हामुळे सकाळच्या सत्रात शाळेसाठीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहणार

अ) प्राथमिक शाळा

७:०० ते ७:१५ परिपाठ

७:१५ ते ७:४५ तासिका – १

७:४५ ते ८.१५ तासिका – २

८:१५ ते ८.४५ तासिका – ३

८:४५ ते ९:१५ तासिका – ४

९:१५ ते ९:४५ भोजन/सुट्टी

९:४५ ते १०:१५   तासिका – ५

१०:१५ ते १०:४५ तासिका – ६

१०:४५ ते ११:१५ तासिका – ७

ब) माध्यमिक शाळा

७:०० ते ७:१५   परिपाठ

७:१५ ते ७:४५    तासिका – १

७:४५ ते ८.१५    तासिका – २

८:१५ ते ८.४५    तासिका – ३

८:४५ ते ९:१५   तासिका – ४

९:१५ ते ९:४५   भोजन/सुट्टी

९:४५ ते १०:१५    तासिका – ५

१०:१५ ते १०:४५ तासिका – ६

१०:४५ ते ११:१५   तासिका ७

११:१५ ते ११:४५ तासिका – ८

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!