नांदेड – जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे पोस्टर आमच्या दुकानासमोर का लावता म्हणून बॅनरची नासधूस तसेच मारहाण केल्याप्रकरणी १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तामसा येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
तामसा येथे १३ एप्रिल रोजी नागोराव धोंडीबा जाधव व इतर काही तरुण जुने बसस्थानक, डॉ. आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे बॅनर लावत होते. त्यावेळी आमच्या दुकानासमोर बॅनर लावू नका असे म्हणून सलीम चौधरी व त्याचे दोन मुले, कलीम बागवान, अहमद बागवान, खाजा कुरेशी यांचा मुलगा, शेख अहमदचा मुलगा, एजाज बागवान, मुस्ताक कुरेशी, शोएब कुरेशी, अफसर बागवान, इरफान चौधरी आणि इतर जवळपास १०० जणांनी वाद घातला. आमच्या दुकानासमोर बॅनर लावू नका म्हणून त्यांनी बॅनरची नासधूस केली तसेच राहुल मुकिंदराव जाधव यांना मारहाण करून जखमी केले.
याप्रकरणी नागोराव जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे बॅनर फाडल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या तसेच मारहाण केल्याची तक्रार तामसा पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून उपरोक्त शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तामसा येथे रविवारी रात्री काही काळ तणावही निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच बंदोबस्त तैनात करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आता तामसा येथल परिस्थिती नियंत्रणात आणि शांततेत असल्याचे पोलीस विभागाकडून कळवण्यात आले आहे.