
नांदेड – नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील वसरणी येथील नाल्यामध्ये गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून गोळीबाराचा प्रकार घडला. या घटनेत एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. घटनास्थळी पोलिसांना एक जीवंत काडतूसही सापडले आहे.
रविवारी सकाळी ११ वाजेदरम्यान नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचले. या व्हीआयपी बंदोबस्तात पोलीस यंत्रणा असताना नवीन नांदेडातील वसरणी भागातील नाल्यामध्ये मात्र गुन्हेगारी टोळ्यांमध्ये थेट राडा सुरू होता. या राड्यामध्ये गोळीबाराचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारात परवेज नामक एकाचा मृत्यू झाला आहे. तर तेजसिंग बावरी यांच्यावरही गोळ्या झाडल्या आहेत. तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कौठ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी एक दुचाकी पोलिसांना सापडली आहे. घटनास्थळी नाल्यामध्ये तेजासिंग बावरी हा पडला होता. त्याला जखमी अवस्थेत पोलिसांनी रुग्णालयात हलवले आहे. या घटनेत परवेजचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी नांदेड ग्रामीण पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह फॉरेन्सिक तपास पथकही दाखल झाले होते. घटनास्थळी पोलिसांना काडतूसांचे कव्हर तसेच एक जिवंत जीवंत काडतूसही आढळले आहे. घटनेबाबत जखमी तेजासिंग बावरी याच्याकडून पोलीस अधिक माहिती घेत आहेत. तेजासिंगच्या घरापासून काही अंतरावरच ही घटना घडली आहे.
या घटनेतील आरोपींच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली आहेत. लवकरच गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी व्यक्त केला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आरोपी हेही अटल गुन्हेगार आहेत. त्यांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील, असेही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले.