
नांदेड – नांदेड मध्यवर्ती बस स्थानकाच्या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरीही या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक असलेली क्युरिंग, फुटपाथ, पथदिवे आणि इतर उर्वरित कामे शिल्लक आहेत. १५ मे पासून नांदेड मध्यवर्ती बस स्थानक पुन्हा नांदेड शहरातून सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसे स्पष्ट संकेतही दिले आहेत. मात्र अवकाळी पाऊस थांबल्यास आणखी दोन ते तीन दिवस क्युरिंगसाठी घेतले जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रवाशासह परिवहन विभागालाही बस स्थानक नांदेड शहरातून लवकर सुरू व्हावे, अशीच अपेक्षा आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी प्रारंभी २१ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र ३० दिवसानंतरही काम पूर्ण होऊ शकले नाही.
नांदेड मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरापर्यंतच्या रस्ता मजबुतीकरणासह पदपाथ, पथदिवे आडी कामांसाठी रस्त्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकाचे १३ एप्रिल रोजी नवीन कौठा भागातील मोदी मैदान येथे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मात्र या तात्पुरत्या बस स्थानकात प्रवाशांना कोणत्याच मूलभूत सुविधा यासह सुरक्षाही मिळत नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. मोबाईल, पाकीट चोरी, वाटमारीसारखे प्रकार दररोज होत आहेत. त्यात नांदेड शहरात येण्यासाठी आणि शहरातून बस स्थानकाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचे प्रकारही पुढे आले आहे. त्यामुळे आता हे बस स्थानक मूळ ठिकाणी कधी स्थलांतर होईल, याकडे लक्ष लागले आहे. बस स्थानकाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरीही सिमेंट रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक असणारी क्युरिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे ही क्युरिंग आता किती दिवस केली जाईल, हेही महत्त्वाचे आहे.
तात्पुरत्या स्थलांतरित करण्यात आलेल्या नवीन कौठा भागातील बस स्थानकात प्रवाशांना होणाऱ्या असुविधा लक्षात घेता १५ मे पासून मध्यवर्ती बस स्थानक पुन्हा नांदेड शहरातून कार्यरत होईल, असे सांगितले जात आहे. मात्र अवकाळी पाऊस लांबल्यास सिमेंट रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आणखी काही दिवस क्युरिंगसाठी घेतले जाऊ शकतील, असेही सांगितले जात आहे. ज्याद्वारे हा रस्ता कायमस्वरूपी मजबूत होईल, यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे कामही यादरम्यान करण्यात आले. हे काम करण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागला. या काळात बस स्थानकाच्या रस्त्याचे काम पूर्णतः थांबले होते. त्यामुळे हे पाच दिवस अधिकचे लागले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे कौठा भागातील मध्यवर्ती बस स्थानकात मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. त्यामुळे बस स्थानकात बस न जाता मुख्य रस्त्यावरच उभ्या राहत होत्या. रस्त्यावर कुठेही जागा मिळेल तिथे बस थांबवली जात होती. त्यामुळे प्रवाशांना आपल्याला जाण्यासाठी आवश्यक असलेली बस नेमकी कुठे थांबली याची माहिती होत नव्हती. यासाठी परिवहन विभागाकडून अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून प्रवाशांना माहिती देणे गरजेचे होते; मात्र असे काही घडलेच नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. रविवारी दुपारनंतर कौठा भागातील तात्पुरत्या बस स्थानकात बस गेल्या. त्यामुळे प्रवाशांना काही अंशी का होईना दिलासा मिळाला.
मध्यवर्ती बस स्थानक पुन्हा शहरात कार्यान्वित व्हावे अशी प्रवाशांची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे परिवहन विभागही यासाठी प्रयत्नशील आहे. लग्न सराई आणि सुट्ट्यांचा कालावधी पाहता परिवहन विभागाचे मोठे नुकसान या तात्पुरत्या बस स्थानक स्थलांतरणामुळे होत आहे. त्यामुळे नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून वाहतूक सुरू केल्यास उर्वरित कालावधीत परिवहन विभाग झालेला तोटा भरून निघेल, या अपेक्षित आहे; मात्र आणखी तीन ते चार दिवसाचा कालावधी मिळाल्यास रस्त्याचे मजबुतीकरण आणि फूटपाथ, पथदिवे आदी उर्वरित कामेही गतीने करता येतील, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून १५ मे रोजी वाहतूक सुरू केली जाईल, अशी जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे. त्याचवेळी आणखी दोन किंवा तीन दिवस क्युरींगसाठी मिळाल्यास हा सिमेंट रस्ता कायमस्वरूपी टिकणारा होईल, अशी भूमिकाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात येत आहे. तशी परवानगी जिल्हा प्रशासनाकडून मिळाल्यास आणखी दोन किंवा तीन दिवस नांदेड बस स्थानकाचे शहरातील मूळच्या जागी परत येणे लांबणार आहे, हे निश्चित. पण त्यात प्रवाशांना होणाऱ्या असुविधा लक्षात घेता प्रशासनाकडून अशी मुदतवाढ दिली जाईल की नाही याबाबत सांगणे कठीण आहे; पण त्याचवेळी अवकाळी पाऊस थांबल्यास मात्र आणखी दोन-तीन दिवसांची मुभा प्रशासनाकडून दिली जाईल, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे.