
नांदेड – नांदेडमध्ये काँग्रेसने तब्बल ४० वर्षानंतर अल्पसंख्यांक समाजाला उमेदवारी दिली आहे. या समाजाचा आतापर्यंत नेहमी वोट बँक म्हणून वापर करण्यात आला. मात्र काँग्रेसने या निवडणुकीत मला उमेदवारी देऊन अल्पसंख्यांक समाजाला न्याय दिला आहे. यासाठी मी काँग्रेस नेत्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचेही आभार मानतो. या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघात आणि लोकसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नांदेड उत्तरचे काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीचे नांदेड उत्तरचे काँग्रेस उमेदवार अब्दुल सत्तार यांनी नांदेड उत्तर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्याशी ‘नांदेड स्क्रिप्ट’शी बातचीत केली असता त्यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील सर्व नऊ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसने गेल्या ४० वर्षात नांदेडमध्ये मुस्लिम उमेदवाराला संधी दिली नव्हती, मात्र आता ही संधी मिळाली आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे आपण आभार व्यक्त करतो. त्याचवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ही जागा असतानाही त्यांनी महाविकास आघाडीत काँग्रेसला ही जागा दिली आहे. त्यात मला उमेदवारी देऊन अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नांदेडमधून हा एक वेगळा संदेश जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्वच जागावर वर्चस्व राहणार असल्याचे काँग्रेसचे नांदेड उत्तरचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे नेते आनंद चव्हाण, शमीम अब्दुल्ला, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मसूद खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
एकदा महापौर, दोन वेळा स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेत्याचीही जबाबदारी पाडली आहे पार…काँग्रेसचे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी १९९२ ते २०१७ पर्यंत सलग नगरसेवक म्हणून नांदेडमध्ये काम केले आहे. नांदेड महापालिका स्थापनेच्या पहिल्याच निवडणुकीनंतर त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद १९९७ मध्ये आले. त्यानंतर २००५ मध्ये ते सभागृह नेता म्हणून कार्यरत होते. २००६ आणि २००८ मध्ये त्यांनी नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती पदही भूषविले आहे. २०१२ मध्ये ते नांदेडच्या महापौरपदी विराजमान झाले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे महापालिकेच्या स्थापनेपासून ते नगरसेवक म्हणून कार्यरत राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेसकडे विधान परिषद तसेच विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी अनेकदा उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांना दुर्लक्षितच ठेवण्यात आले होते. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नांदेड उत्तर मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी दिल्याने आता न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. सर्व समाज घटकांच्या जोरावर आपण विजयश्री खेचून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.