क्राईम

पांगरी शिवारात पोलिसांच्या गोळीने जखमी झालेल्या प्रभाकर हंबर्डेला दोन दिवसांची पोलीस कोठडी

जामिनावर सुटल्यावर मित्राच्याच खुनाच्या केला होता प्रयत्न, वसरणी गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीही पोलिसांच्या रडारवर

नांदेड – मोक्कांतर्गत कारागृहात स्थानबद्ध असलेल्या विष्णुपुरी येथील सराईत गुन्हेगार प्रभाकर शंकरराव हंबर्डे याने जामिनावर बाहेर येताच आपल्या मित्रावरच १८ मे रोजी जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच त्याने गावठी पिस्तूल रोखले. त्यावेळी त्याच्यावर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी गोळ्या झाडल्या. उपचारानंतर त्याला १२ जून रोजी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नांदेड ग्रामीण ठाणे हद्दी अंतर्गतच वसरणी शिवारात गोळी झाडून एकाचा खून करणाराही लवकरच पोलिसांच्या हाती लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून प्रभाकर शंकरराव हंबर्डे याचा शोध सुरू होता. ३ जून रोजी तो विष्णुपुरी परिसरात आला असल्याची माहिती मिळाली. नांदेड ग्रामीण पोलीस आपल्या मार्गावर असल्याची माहिती त्याला मिळताच त्याने दुचाकीवर पांगरी शिवाराकडे पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला असताना त्याने पांगरी शिवारातील कॅनॉल रोडवर दुचाकी फेकून तो जंगलात पळाला. पोलिसांनीही त्याचा पाठलाग केला असता प्रभाकर हंबर्डे याने पोलिसावर पिस्तूल रोखले. पिस्तूल रोखताच नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी त्याच्या कमरेखाली गोळी झाडली आणि तो जागीच कोसळला. त्याच्यावर विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले त्याला १२ जून रोजी न्यायालयापुढे ग्रामीण पोलिसांनी हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. विष्णुपुरी येथील प्रभाकर शंकरराव हंबर्डे हा सराईत गुन्हेगार मोकाअंतर्गत कारागृहात स्थानबद्ध होता. त्याच्यावर वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे ९ गुन्हे दाखल आहेत.

दुसरीकडे नवीन नांदेडातील वसरणी येथे ११ मे रोजी महापालिकेच्या मल शुद्धीकरण केंद्र परिसरात गुन्हेगारी टोळ्यामध्ये झालेल्या वादातून एकाचा खून करण्यात आला होता. यात शेख परवेज हा जागीच ठार झाला तर दुसरा तेजसिंग बावरी हा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणाच पोलिसांना हवा असलेला मुख्य आरोपी कमलेश लिंबापुरे उर्फ आशु पाटील हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याचा शोध घेतला जात असून तो लवकरच गजाआड होईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी व्यक्त केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!