
नांदेड – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय लगबग सुरू झाली आहे. या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भातील कालबद्ध कार्यक्रमही घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार ड वर्ग असलेल्या नांदेड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध केली जाणार आहे. नांदेड महापालिकेच्या प्रभाग रचनेसाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, निवडणूक विभागाच्या उपायुक्त सुप्रिया टवलारे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्याच्या नगरविकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार प्रभाग रचनेच्या कामाला प्रारंभ झाला आहे. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार ड वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने २०२५ मध्ये होणाऱ्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बहु सदस्य प्रभाग पद्धती राहणार आहे. प्रत्येक प्रभागात चार सदस्यांचा समावेश असेल तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची अलीकडील आकडेवारी म्हणजेच २०२१ ची लोकसंख्या विचारात घेऊन दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिक क्षेत्राची निवडणूक प्रभागामध्ये विभागणी करणे, प्रगणक गटांची मांडणी करणे, प्रभागांची संख्या, सरासरी लोकसंख्या, प्रभाग रचनेची दिशा ठरवून हद्द निश्चित करणे आदी तांत्रिक कामे करून शासन निर्देशानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार केली जाणार आहे.
या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, सहाय्यक संचालक नगर रचना पवन आलूरकर, निवडणूक विभागाच्या उपायुक्त सुप्रिया टवलारे, निवडणूक विभागाच्या सहाय्यक आयुक्त मनीषा नरसाळे, नगररचना विभागाचे उपअभियंता खुशाल कदम आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या संपूर्ण कामकाजावर महापालिका आयुक्तांचे सनियंत्रण राहील.
दोन दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी निवडणूक तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत निवडणूक अनुषंगिक कामे तातडीने पार पाडण्याचे आदेश डॉ. डोईफोडे यांनी दिले होते. त्यानुसार आता वेगवेगळ्या समित्यांची स्थापना होत असून निवडणुकांच्या रणधुमाळीला प्रशासकीय पातळीवर प्रत्यक्ष प्रारंभ झाला आहे. राजकीय पातळीवरही महायुती, महाविकास आघाडी यावर चर्चा सुरू आहे. त्याचवेळी प्रत्यक्ष रणांगणात उतरताना ‘एकला चलो रे’ चा नाराही वेळोवेळी देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात नांदेड महापालिकेच्या या निवडणुका एकत्र का स्वतंत्र लढल्या जातील, याकडेही लक्ष लागले आहे.