
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात गोळेगाव येथे एका विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकरास सासरच्या मंडळींनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. ही बाब माहेरच्यांना कळवत तरुणीला घेऊन जाण्यास सांगितले. तरुणीच्या वडिलांनी मुलीस आणि तिच्या प्रियकराला गावी घेऊन जात असल्याचे सांगून वाटेतील करकाळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या घटनेतील तरुणीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला असून प्रियकराचा अद्याप शोध लागला नाही. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील संजीवनी कमळे या तरुणीचा गतवर्षी गोळेगाव येथील युवकासोबत विवाह झाला होता. मात्र सदरील तरुणीचे गावातीलच लखन बालाजी भंडारे या युवकासोबत प्रेम संबंध होते. हे प्रेमसंबंध लग्नानंतरही कायम असल्याचे पुढे आले आहे. याबाबत तरुणीच्या वडिलांनी लखन भंडारे यास हे संबंध थांबविण्याबाबत वारंवार समजावून सांगितले होते. तरीही तरुणीचा प्रियकर लखन हा सोमवारी तिच्या सासरी गोळेगाव येथे भेटायला आला होता. ते दोघे एका घरामध्ये आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. तरुणीच्या सासरच्या मंडळींनी त्यांना रंगेहाथ पकडून बांधून ठेवले. हा सर्व प्रकार तरुणीच्या माहेरी कळविण्यात आला. त्यावेळी तरुणीचे वडील मारुती सुरणे व इतर दोघेजण गोळेगावला पोहोचले. सासरच्या मंडळींनी घडला प्रकार संजीवनीच्या वडिलांना सांगितला आणि आपली मुलगी घेऊन जा असे सांगितले. त्यावेळी वडील सुरणे व इतर नातेवाईकांनी तरुणी आणि तिच्या प्रियकरास गावाकडे नेत असल्याचे सांगून गोळेगावहून निघाले. करकाळा मार्गे ते पायीच बोरजुनीला जात होते. वाटेतच झाल्या प्रकाराचा संताप आल्याने तरुणीच्या वडिलांनी व इतर नातेवाईकांनी दोघांनाही करकाळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिले. दोघांचेही हात बांधलेले असल्याने त्यांना विहिरीबाहेर पडता आले नाही. ही बाब काही वेळाने उघडकीस येताच स्थानिकांनी या दोघांचाही शोध सुरू केला. त्यात रात्री उशिरा तरुणीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला आहे. तरुणाचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील, उमरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. या प्रकरणात मुलीच्या वडिलांसह इतर काही जणांना उमरी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे



