नांदेड – वंदे भारत एक्सप्रेस ही विकसित महाराष्ट्राच्या प्रगतीचे पहिले पाऊल आहे. मंगळवारी नांदेड- मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडहून प्रारंभ झाला आहे. या गाडीचा वेळ कमी करून ही गाडी सात तासात आगामी काळात मुंबईला पोहोचेल, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री
खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. नांदेड मुंबईसह नांदेड – नागपूर, नांदेड- पुणे हे मार्गही वंदे भारतने जोडल्यास व्यापार आणि उद्योगास गती मिळणार आहे. नांदेडच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल. बंद झालेली नांदेड विमान सेवाही लवकरच सुरू होईल, असेही चव्हाण म्हणाले.
नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडे, विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते.
मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन येथील गतिमान दळणवळणावर भर देत आहे. ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखे आरामदायक सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. मुंबई ते नांदेड हे ६१० किलोमीटरचे अंतर ९ ते ९.३० तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेडपर्यंत जात आहे. या रेल्वे गाडीची क्षमता ५०० वरून १४४० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे ८ वरून २० पर्यंत वाढवण्यात आले आहे. नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
नांदेड येथील रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमप्रसंगी खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सत्यप्रकाश, विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी आदीची उपस्थिती होती. आमदार विक्रम काळे यांनी नांदेड येथून मुंबईसाठी आणखी एक विशेष रेल्वे नांदेडहूनच सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. नांदेड येथून वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.