क्राईम

अभियंता दिनीच नांदेड महापालिकेचा उपअभियंता २८ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गजाआड 

दोन प्लॉटच्या गुंठेवारीची संचिका मंजूर करण्यासाठी मागितले होते साठ हजार रुपये, वसरणी येथील घराचीही झडती सुरू

नांदेड – एकीकडे अभियंता दिनानिमित्त महापालिकेतील अभियंत्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार होत असतानाच महापालिकेतील गुंठेवारी विभागातील कंत्राटी उपअभियंता विजय शेषराव दवणे हा लाच घेत असताना रंगेहाथ सापडला आहे. दोन प्लॉटच्या गुंठेवारीची संचिका मंजूर करण्यासाठी ६० हजार रुपये मागणी त्याने केली होती. शेवटी तीस हजार रुपयांवर आणि पुढे २८ हजार रुपयांवर तडजोड झाल्यानंतर ही रक्कम घेत असताना विजय दवणेला लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ महापालिकेत पकडले. विशेष म्हणजे या प्रकरणातील तक्रारदारही स्थापत्य अभियंता आहे.

परवानाधारक स्थापत्य अभियंता असलेले २७ वर्षीय तक्रारदार यांनी त्यांच्या मार्फत दोन मालमत्ता धारकांची संचिका गुंठेवारी विभागात मंजुरीसाठी दाखल केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी उपअभियंता विजय दवणे यांची भेट घेतली. तेव्हा उपअभियंता विजय दवणे यांनी त्या दोन्ही फाईलवर मान्यतेसाठी शिफारस करण्यासाठी प्रथम ६० हजार रूपयाची मागणी करून तडजोडीअंती ३० हजार रूपये घेण्याचे ठरले. उपअभियंता विजय दवणे हे मागत असलेले ३० हजार रूपये ही लाच असून ती देण्याची तक्रारदार यांना इच्छा नव्हती. त्यांनी याबाबत १५ सप्टेंबर रोजी नांदेड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाचेची मागणी होत असल्याबाबत लेखी तक्रार दिली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ महापालिकेत शासकीय पंचासमक्ष लाचेची पडताळणी केली. त्यावेळी यातील इतर लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांचेवतीने गुंठेवारी मंजूरीसाठी दाखल केलेल्या दोन मालमत्ताधारकांचे संचिकेवर मान्यतेसाठी शिफारस करण्यासाठी ३० हजार रूपयाची मागणी करून तडजोडीअंती २८ हजार रूपये लाच स्विकारण्याची सहमती दर्शविली. १५ सप्टेंबर रोजीच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या गुंठेवारी विभागातच सापळा रचला. त्यावेळी यातील लोकसेवक विजय दवणे याने तक्रारदार यांना त्यांचे वतीने गुंठेवारी मंजुरीकरिता दाखल केलेल्या दोन संचिकेवर मान्यतेची शिफारस करण्यासाठी लाचेची रक्कम २८ हजार रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारली.

यावेळी आरोपी विजय दवणेच्या अंग झडतीत रोख ७ हजार २० रूपये व एक मोबाईल रियलमी 9 ए कंपनीचा सापडला. तो तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे.  यातील आरोपी विजय दवणे याचे वसरणी, नांदेड येथील राहते घराची घरझडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी कंत्राटी उपअभियंता विजय शेषराव दवणे याच्याविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अनिता दिनकर, पोलीस निरीक्षक करीम खान पठाण , पोलीस निरीक्षक प्रीती जाधव यांच्यासह पोहेकॉ अरशद अहेमद खान, पोकॉ सय्यद खदीर, श्याम गोरपल्ले, पोहेकॉ गजानन राऊत यांनी पार पाडली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!