
नांदेड – जायकवाडी, दिग्रस तसेच पूर्णा नदीतून येणारा पाण्याचा येवा सुरूच असल्याने विष्णूपुरी प्रकल्पातूनही मोठा प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात आहे. सद्यस्थितीला १४ दरवाज्यातून १ लाख ८० हजार क्युसेस वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदी आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे. सद्यपरिस्थितीत गोदावरी नदीची पाणीपातळी जुन्या पुलाजवळ ३५०.६० मीटरवर पोहोचली आहे. ३५१ मीटर ही धोक्याची पातळी आहे. त्यामुळे सतर्कतेच्या उपायोजना म्हणून जुन्या नांदेडसह नवीन नांदेडातील काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच महापालिकेने जुन्या नांदेडात निवारा केंद्रही उघडले आहेत.
मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पातून सध्या ९ हजार ४४३ क्युसेस वेगाने पाणी गोदावरी पात्रात सोडले जात आहे. त्याचवेळी गोदावरी नदीवरील दिग्रस बंधाऱ्यातूनही २ लाख ७५ हजार क्युसेक वेगाने पाणी सुरू आहे. हा सर्व पाण्याचा येवा सुरूच असल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातूनही सद्यपरिस्थितीत १ लाख ८० हजार क्युसेस वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडले जात आहे. प्रकल्पाचे १४ दरवाजे सध्या उघडे आहेत. गोदावरी नदीला मोठा पूर आला असून गोदावरी नदी आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे. याघडीला गोदावरी नदीची पाणीपातळी जुन्या पुलाजवळ ३५०.६० मीटरवर पोहोचली आहे. ३५१ मीटर ही धोक्याची पातळी आहे.त्यात हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासाठी १८ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळेही चिंता कायमच आहे.
विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसाने विष्णुपुरी प्रकल्पातून सध्या सुरू असलेला विसर्ग वाढवून २ लक्ष ते २.२५ लक्ष क्युसेस करण्याची शक्यता असल्याने नांदेड शहरालगत नदीची पातळी इशारा पातळी ३५१.०० मीटरच्या वर जाण्याची शक्यता आहे. परिणामी जुन्या नांदेडातील काला पूल भागातील काही कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे त्याचवेळी वसरणी भागातील पंचवटी नगरातील २० ते २५ कुटुंबांनाही स्थलांतरित करण्यात आले आहे. पूर परिस्थिती लक्षात घेता नांदेड महापालिकेने किल्ला आणि गाडीपुरा येथील राष्ट्रीय गांधी विद्यालय येथे निवारा केंद्रही उघडले आहेत. या निवारा केंद्रात नदीकाठच्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. रात्रीतून आणखी काही गरज पडल्यास या ठिकाणी नदीकडच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.



