
नांदेड – नांदेड जिल्ह्यात पोलीस विभाग तसेच महसूल विभागाकडून अवैध वाळू उपसा तसेच वाहतुकीविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. मात्र याही परिस्थितीत अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचे मनसुबे आणखी मोठे असल्याचे नांदेड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील बहुचर्चित येळी, महाटी या वाळूघाटावर अवैधरित्या उपसा करण्यासाठी जात असलेल्या महाकाय बोटी चंदासिंग कॉर्नर येथे पकडण्यात आल्या. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील कंटेनर चालकास अटक करण्यात आली आहे. कंटेनरसह पोलिसांनी दोन बोटी असा एकूण ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता चंदासिंग कॉर्नर या ठिकाणी एमएच ५३ बी ०३०२ या कंटेनरमध्ये दोन लोखंडी बोटी आढळून आल्या. याबाबतचा चालकास विचारले असता तो माहिती देण्यास टाळाटाळ करत होता. त्याला बोटीचे आणि गाडीचे कागदपत्र विचारले असता कोणतेही कागदपत्र नसल्याचे त्याने सांगितले. त्यास बोट वाहतूक करण्याचा उद्देश विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. संशयास्पद बोलण्यावरून त्याची अधिक चौकशी केली असता या बोटी अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी येळी, महाटी या बहुचर्चित घाटावर नेल्या जात असल्याचे त्याने सांगितले. गोदावरी नदीतून हा वाळू उपसा करण्यासाठीची तयारी सुरू होती. या कंटेनर चालकाचे नाव विशाल बाळासो सोनमाळे वय 25 वर्षे आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोहेकॉ शेख इब्राहिम, भोसले, माने यांनी केली आहे. या कारवाईचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.
नांदेड जिल्ह्यात पोलीस दलाकडून अवैध वाळू उपसा तसेच वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकाही वाळू घाटावरून उपसा करण्याची परवानगी नसताना बहुतांश ठिकाणी चोरून वाळू उपसा केला जात आहे. काही ठिकाणी स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वाळू उपसा करण्यास परवानगी नसतानाही वाळूमाफियांकडून वाळू धंद्यात कोट्यवधींची गुंतवणूक केली जात आहे. ही गुंतवणूक नेमकी कोणाच्या विश्वासावर केली जात आहे. हा प्रश्नही आता पुढे आला आहे. महसूल विभागाकडूनही या अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध कधीकधी कारवाई केली जाते; मात्र महसूल विभागाची ही मुख्य जबाबदारी असताना त्याकडे काना डोळाच होत आहे, हे स्पष्ट आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही या विषयात आतापर्यंत का हात घातला नसावा हा प्रश्नच आहे. काही दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी कर्डिले यांनी रहाटी येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांना जिल्ह्यात अवैध वाळू उपसा किती प्रमाणात होत आहे याचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. हे पाहून त्यांनी महसूल तसेच पोलीस विभागाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर कारवाईही झाली; मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती त्या भागात आजही आहे.



