
नांदेड/श्रीक्षेत्र माहूर : स्वतःच्या शेतात कापूस वेचणी करणाऱ्या दोन सख्ख्या जावांचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास माहूर तालुक्यातील पाचुंदा येथे घडले या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना लूटमारीच्या उद्देशाने घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात आता या दुहेरी हत्याकांडाचा तपास माहूर पोलिसांकडून केला जात आहे.
मृत महिलांची नावे अंतकलाबाई अशोक आढागळे वय ६० वर्ष, अनुसयाबाई साहेबराव आढागळे वय ४५ वर्ष अशी आहेत. दोघीही कापूस वेचणीसाठी शेतात गेल्या होत्या. त्याचदरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने गळा दाबून त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास प्रक्रिया सुरू केली आहे. हत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब असल्याने लुटमारीच्या उद्देशाने सदरील खून झाल्याची चर्चा परिसरात होत आहे पण त्याचवेळी या महिलेच्या कानातील आणि पायातील दागिने मात्र तसेच आहेत. त्यामुळे दागिन्यासाठी खून झाला का याबाबतही आता साशंकता घेतली जात आहे. तर एका महिलेच्या अंगावरील कपडे अस्तव्यस्त असल्याने अतिप्रसंगाचाही प्रकार असावा अशीही एक शक्यता पुढे येत आहे. त्यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.
या दुर्दैवी व हृदयद्रावक घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व अस्वस्थता पसरली आहे. माहूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र फिरवली आहेत.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले, तपासाच्या अनुषंगाने वेगवेगळी पथके पाठविण्यात आली आहेत. माहूर पोलीस घटनास्थळी असून तांत्रिक बाबीही तपासल्या जात आहेत. या खुनाचा नेमका उद्देश काय असावा या दृष्टीनेही पोलीस माहिती घेत आहेत. फॉरेन्सिक पथक, डॉग स्कॉडही पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात सर्वच अँगलने तपास सुरू असल्याचेही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.



