
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत साठवणूक केलेला २ लाख ४७ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. यातील आरोपींविरुद्ध कलम १२३ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून अशा अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात आहे की काय असा प्रश्नही पुढे आला आहे. त्या प्रामुख्याने स्थानिक गुन्हा शाखा करते तरी काय याबाबतही चर्चा होत आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात दिनांक १ ते ३१ मे दरम्यान अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेच्या १५ व्या दिवशी, पोलीस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखालील पथकाने, नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत साठवणूक केलेला २ लाख ४७ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. यातील आरोपींविरुद्ध कलम १२३ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर, मटका-जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण १० इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ४५ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच, अवैध दारू विक्री करणाऱ्या २७ इसमांविरुद्ध २४ गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्धही दोन गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ४६ लाख ११ हजार ८०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई सोबतच, शस्त्र अधिनियमान्वये (३), कोटपा अन्वये (२) तर इतर अधिनियमाखाली मिळून एकूण ४४ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून एकूण ६५ लाख ७१ हजार ४२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खबर ‘ हेल्पलाइनला नागरिकांचा प्रतिसाद… अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली आहे. सदर हेल्पलाइनला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.



