सामाजिक

नांदेडमध्ये पोलिसांनी भीम जयंती मिरवणुका हुसकावल्या..!

नवीन नांदेडसह जुन्या नांदेडातील मिरवणुकांना जुन्या मोंढ्यातूनच हाकलले, जयंती मंडळांना आपल्या देखाव्यांनाही ठेवावे लागले गुंडाळून 

नांदेड – संपूर्ण राज्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह मंगळवारी शिगेला पोहोचलेला असताना नांदेडमध्ये पोलिसांनी मात्र आपल्या दडपशाहीचे दर्शन घडविले. नवीन नांदेड आणि जुन्या नांदेडातून डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाऊ न देता जुन्या मोंढ्यातूनच अक्षरशः हुसकावून लावल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे आंबेडकरी जनतेत पोलिसांच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून नांदेडमध्ये डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुका गुंडाळण्याचीच भूमिका पोलीस प्रशासनाने घेतलेली पहावयास मिळत आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा काल १४ एप्रिल रोजी पहावयास मिळाला. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीतील डीजे हा कळीचा मुद्दा ठरला असला तरी डीजे बंद ठेवत आंबेडकर जयंती मंडळांनी सादर केलेले देखावे पहायला येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. सामाजिक संदेशाची भूमिका ठेवून हे देखावे तयार केले जातात. हे देखावे डीजे बंद करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाऊ देणे आवश्यक होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही.

मंगळवारी जुन्या मोंढ्यात दोन डीवायएसपीच्या नेतृत्वाखालील पोलीस ताफ्याने रात्री १० वाजेनंतर नवीन नांदेडकडून गोदावरी नदीवरील नवीन पुलावरून येणाऱ्या प्रत्येक भीम जयंती मंडळांच्या वाहनांना दंडुक्याच्या बळावर जुन्या मोंढ्यातूनच हुसकावून लावले. जयंती मंडळाकडून आपले देखावे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्याबाबत कोणतीच चर्चा न करता त्यांना तिथूनच परत पाठविले. अशीच परिस्थिती जुन्या नांदेडातून येणाऱ्या जयंती मंडळांचीही करण्यात आली. गाडीपुरा भागातील रेणुका माता मंदिर तसेच काही मंडळांना तर आहे त्या ठिकाणावरूनच मिरवणुका गुंडाळण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पोलिसी बळ असो किंवा कायद्याचे पालन या भीतीने जयंती मंडळ पोलिसांच्या या भूमिकेचा कोणताही विरोध करू शकले नाहीत.

त्यामुळे जुन्या व नवीन नांदेड भागातील मिरवणुकांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाऊ देण्यास मज्जाव का केला गेला हा प्रश्न पुढे येत आहे. डीजे बंद करून मिरवणुका पुतळ्यापर्यंत जाऊ देण्याची मागणी मंडळानी केली होती. यापूर्वी शहरातून निघालेली एक शोभायात्रा रात्री १० वाजेनंतर निश्चित स्थळापर्यंत पोलीस बंदोबस्तात पोहोचविण्यात आली होती. पण त्याचवेळी आंबेडकरी मिरवणुका निश्चित स्थळापर्यंत जाऊ देण्यास पोलिसांनी का आडकाठी आणली, यावरही आता चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी डीजे बंद करून मिरवणुका डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाऊ देणे गरजेचे होते. आज जुन्या मोंढ्यातून आंबेडकर जयंती मिरवणुका हुसकावल्या उद्या मिरवणुका काढूच नका अशी भूमिका पोलीस घेणार आहेत का असा संतप्त सवाल मिरवणुकीत सहभागी भीम अनुयायांनी केला आहे.

प्रत्येक भीम अनुयायी आणि जयंती मंडळ यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास विनम्र अभिवादन करायचे असते. जयंती मंडळाकडून तयार करण्यात येणारे देखावे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत नेण्यात येतात; मात्र यंदा पोलिसांच्या आडमुठ्या धोरणामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यपर्यंत पोहोचल्याच नाहीत. निम्म्या अंतरावरूनच त्या हूसकावण्यात आल्या. त्यामुळे देखावे तयार करायचे कशासाठी हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जयंती मंडळाच्या मिरवणुकामध्ये सहभागी वाहनामध्ये महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित असते या महिलांनाही पोलिसांनी मिरवणुका माघारी काढल्यामुळे पुतळ्यापर्यंत जाऊन अभिवादन करता आले नाही. जयंतीदिनी आंबेडकर अनुयायांना आणि मिरवणुकांना जयंतीदिनी पुतळ्यापर्यंत जाऊ न देणे हे कोणत्या नियमानुसार केले याचा खुलासा करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!