राजकीय

नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचे पाच उमेदवार केले घोषित, महायुतीत बेबनाव..!

भाजपाकडून युतीचा प्रस्ताव आल्यास दोन पाऊल मागे घेण्याचीही दर्शवली तयारी, शिवसेनेशी चर्चेची एक फेरी झाल्याची आ.चिखलीकरांची माहिती 

नांदेड – महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नांदेड जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाचे पाच उमेदवार घोषित केले आहेत. पक्षाचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचीही उपस्थिती होती.

जिल्ह्यातील बारा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. १० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचवेळी १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज भरण्यास केवळ तीन दिवस उरलेले आहेत. या परिस्थितीत नांदेड जिल्ह्यात अजूनही महायुतीची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नांदेडमध्ये शुक्रवारी पत्रकार परिषदेत घेऊन आपले नगराध्यक्ष पदाचे पाच उमेदवार घोषित केले आहेत. त्यामध्ये देगलूर नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी विजयमाला बालाजीराव टेकाळे, उमरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शकुंतला भगवानराव मुदीराज, धर्माबाद नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी वैशालीताई विनायकराव कुलकर्णी, मुदखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी गिरजाबाई माधवराव पचलिंगे आणि हिमायतनगर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी महंमद जावेद अब्दुल गणी यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी महायुती न झाल्यास राष्ट्रवादी पक्ष सर्वच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका स्वबळावर लढण्यास तयार असल्याचेही प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. त्याचवेळी चिखलीकर यांनीही चव्हाण यांना नांदेडचा रावण संबोधले आहे. त्यामुळे महायुतीची कोणतीही चर्चा जिल्ह्यात सुरूच झाली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चर्चेची एक फेरी झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महायुतीबाबत आ. चिखलीकर यांना विचारले असता भारतीय जनता पक्षाकडून कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. प्रस्ताव प्राप्त झाल्यास आपण त्यावर चर्चा करण्यास तयार आहोत, इतकेच नव्हे तर दोन पाऊल मागे घेऊनही चर्चेस तयार असल्याचे सांगितले; मात्र भाजपाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपाशी युतीबाबत चर्चा करायची कोण समन्वय साधायचा कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे का? यावर चिखलीकर म्हणाले, आम्ही चर्चेला तयार आहोत. आमच्याकडून माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांना पाठवू परंतु युतीचा तसा प्रस्ताव अद्यापही आला नसल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीत भारतीय जनता पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे मोठ्या भावाकडून प्रस्ताव अपेक्षित आहे. प्रस्ताव आल्यास आम्ही दोन पावले मागे सरकायलाही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्वच आमदार आपल्या संपर्कात आहेत. युती संदर्भात शिवसेनेशी चर्चेची एक फेरीही पूर्ण झाली आहे. लवकरच दुसऱ्या फेरीतील चर्चाही होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही चर्चा जिल्ह्यातील बारा नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मोहन हंबर्डे, सुभाष साबणे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, शिवराज पाटील होटाळकर, शिरीष गोरठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!