
नांदेड – शहरात आगेच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अग्निशमन नियमावलींचे पालन केले जात नसल्याची बाब या आगीच्या वाढत्या घटनांवरून पुढे येत आहे. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास लोहार गल्ली भागात असलेल्या लक्ष्मी प्लास्टिक सेंटर अँड इमिटेशन ज्वेलरी या दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने या इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या घरमालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्याचवेळी पार्किंगमध्येच थाटलेल्या या दुकानाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. इतवारा पोलीस दलानेही आग विझविण्यासाठी मदत केली. दुकानाच्या पाठीमागील भाग फोडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे आता शहरातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये अग्निशमन नियमांचे पालन कितपत केले जात आहे..? त्यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही..? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लोहार गल्ली भागात सकाळी साडेआठच्या सुमारास लक्ष्मी प्लास्टिक सेंटर अँड इमिटेशन ज्वेलरी या दुकानाला आग लागली. याबाबत अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. या तीन बंबाचे १२ फायर टेंडर आगीवरती पाणी मारून आग विझवण्यासाठी प्रयत्नरत होते. मात्र अगदी छोट्या जागेमध्ये अंडरग्राउंड बेसमेंटमध्ये हे दुकान असल्याने आगीचा भडका मोठ्या प्रमाणात उडत होता. त्याचवेळी आगीवर नियंत्रण मिळवताना समोरून येणाऱ्या धुरामुळे काम करण्यास अग्निशमन दलाला अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे इमारतीच्या पाठीमागून जेसीबीने भिंत पाडून आगीवर पाणी मारण्यात आले. त्यामुळे ही काही प्रमाणात आटोक्यात आली. समोर आणि पाठीमागून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन बंब कार्यरत होते. १२ फायर टेंडरच्या माध्यमातून आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात जवळपास तीन तासानंतर यश आले आहे. या आगीमध्ये दुकान मालक गजेंद्र वसंतराव बोबडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जवळपास ७० ते ७५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कळविण्यात आले आहे. या ईमारतीतील पहिल्या मजल्यावर लग्न रुखवतचे दुकान होते. त्या दुकानातील तीन ते चार लाख रुपयांचे साहित्य वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्याचवेळी महत्त्वाची बाब म्हणजे इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर इमारत मालक राम वसमतकर हे राहत होते. या आगीच्या काळात वसमतकर आणि कुटुंबीयांना अग्निशमन दलाने पूर्णतः सुखरूप बाहेर काढले.
ही आग विझवण्यासाठी नांदेड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी के.एस. दासरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, मोहम्मद साजिद, पवळे, शिंदे, ताटे, किरकन, तोटावार, खेडकर यांनी परिश्रम घेतले. इतवारा पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी या आगीवरील नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात कार्यरत होते.
नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात अग्निशमन नियमांची पायमल्ली..! नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात अग्निशमन नियमांची पायमल्ली होत असल्याची बाब आगीच्या वाढत्या घटना पाहता पुढे येत आहे. त्यातही प्रामुख्याने आग विझवताना येणाऱ्या अडचणी यामुळे मोठी जीवित हानी होण्याची शक्यता अथवा भीती वर्तवली जात आहे. वेळीच या नियमावलींचे उल्लंघन न रोखल्यास मोठ्या दुर्घटनेला नांदेडकरांना सामोरे जाण्याची भीती वर्तवली जात आहे. आनंदनगर येथील एका हॉटेल तसेच दुकानाला लागलेल्या आगी नंतर वरच्या मजल्यावर मुलींच्या हॉस्टेलमधील तब्बल सत्तर मुलींचा जीव धोक्यात आला होता सुदैवाने अग्निशमन दलाने या मुलींना वेळीच बाहेर काढले. मात्र या घटनेनंतर अग्निशमन नियमावलीचे होत असलेले उल्लंघन समोर आले आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर महापालिका अग्निशमन विभागाने शहरातील सर्व दुकाने, आस्थापना मालक, भोगवटदार गोदाम शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, दवाखाने, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका, वसतिगृह, मंगल कार्यालय, हॉटेल्स, सभागृह, शैक्षणिक इमारती व इतर सर्व व्यावसायिक इमारतीकरिता सक्षम प्राधिकरणाची बांधकाम परवानगी घेताना अथवा बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे. महापालिकेने या सर्व दुकाने, आस्थापना, व्यावसायिकांना नोटीस देताना सात दिवसांची मुदत देत संबंधितांकडून अग्निशमन नियमांचे पालन होत आहे की नाही याबाबत विचारणा केली आहे. त्यानंतर मनपाच्या पथकामार्फत तपासणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. अग्निशमन नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास अशा धोकादायक इमारतीचा विद्युत व पाणीपुरवठा खंडित करून इमारत अथवा इमारतीच्या भागाचा वापर थांबवून इमारत सील करण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात ही कारवाई कोणत्या स्तरावर आहे, मनपाच्या पथकांनी किती दुकाने, दवाखाने, वसतिगृह, सभागृह, आस्थापनांची तपासणी केली. ही बाब अद्यापही अनुत्तरीतच आहे. महापालिकेने ९ डिसेंबर रोजी एका जाहीर नोटीसद्वारे व्यावसायिक तसेच विविध आस्थापनांच्या मालकांना ही नोटीस बजावली होती. प्रत्यक्ष आता कृती होणेही, आवश्यक असल्याचेच स्पष्ट होत आहे.



