
नांदेड – जिल्ह्यात शासकीय कार्यालयातच नव्हे तर आता खाजगी संस्थांमध्येही लाच घेण्याचे प्रकार पुढे येत आहेत. यामध्ये आता शासकीय कर्मचाऱ्यासह शिक्षक वर्गही आता मागे राहिला नसल्याचे आठवडाभरातील लाचेच्या दोन घटना पाहता स्पष्ट होत आहे. दहावीच्या सनदवरील जन्मतारीख दुरुस्त करून देण्यासाठी दोन वेळा एकूण ३३०० घेतल्यानंतरही पुन्हा ४०० रुपयांची लाच घेणाऱ्या सहशिक्षक मनोहर अर्जुनराव शिंदे आणि शिपाई सचिन सतीश शिवरामवार या दोघांवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २९ जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेवरील मुख्याध्यापकासह दोन सहशिक्षकही लाचेच्या जाळ्यात अडकले होते.
नांदेड शहरातील सहयोगनगर येथे असलेल्या महात्मा कबीर विद्यालय येथे तक्रारदाराचे २०१६ मध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. दहावीच्या सनदमध्ये तक्रारदाराची जन्म दिनांक चुकीचे पडल्याने त्यांनी शाळेतील शिक्षक मनोहर शिंदे रा. सहयोगनगर यांच्याकडे संपर्क केला. त्यावेळी शिंदे याने सनदवरील जन्मतारीख दुरुस्ती करून देण्यासाठी प्रारंभी १००० रुपये आणि त्यानंतर पुन्हा २२०० रुपये फोन पे द्वारे घेतले. त्यानंतर शिंदे याने तक्रारदाराच्या व्हाट्सअपवर २७ जानेवारी रोजी दहावीच्या सनदवरील जन्मतारीख दुरुस्तीसाठी आणखी ४०० रुपये लागतील असा मेसेज पाठवला. त्यावेळी तक्रारदाराने ३० जानेवारी रोजी त्यांच्या वडिलांना शाळेत पाठवले. त्यावेळी शिक्षक शिंदे याने तक्रारदार यांच्या वडिलांना सनदवर जन्मतारीख दुरुस्त झाली आहे आणखी ४०० रुपये लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली.
याप्रकरणी लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची २ फेब्रुवारी रोजी महात्मा कबीर विद्यालयात पडताळणी केली. त्यावेळी शिक्षक शिंदेने सनदवरील जन्मतारीख दुरुस्त झाली आहे, मुख्याध्यापकाकडून सनद घेऊन टाक असे सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापकाकडून सनद घेऊन आल्यानंतर तक्रारदारास शिपाई सचिन शिवरामवार रा. यशोधरनगर जयहिंद पार्क सिडको याने ४०० रुपयांची मागणी केली. त्यावेळी हे पैसे कशासाठी असे विचारले असता शिंदे साहेबांनी सांगितले आहेत असे तो म्हणाला. त्यावेळी शिक्षक शिंदे तेथे आला. त्याने ४०० रुपये देऊन टाक तुझे सनदचे काम झाले आहे असे म्हणून झालेल्या कामाचा मोबदला म्हणून ४०० रुपये लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने सध्या माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले असता शिंदे याने फोन पे वर टाक असे सांगितले. त्यावेळी तक्रारदार यांनी तुमच्या नंबरवर ट्रांजेक्शन फेल दाखवत आहे असे म्हणाले असता शिक्षक शिंदे याने शिपाई सचिन शिवरामवार याच्या फोन पेवर ४०० रुपये टाकण्यास सांगितले. त्यावेळी तक्रारदार यांनी सचिनच्या फोन पेवरसुद्धा पैसे जात नाहीत, मी घरी जाऊन उद्या आणून देते असे म्हणून सनद घेऊन परत आली. ३ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात महात्मा कबीर विद्यालयात शिक्षक शिंदे याची तक्रारदारांनी भेट घेतली. त्यावेळी शिक्षक शिंदेने तक्रारदार यांना तुमच्या दहावीच्या सनदवर जन्मतारीख दुरुस्त करून आणले आहे. झालेल्या कामाचा मोबदला म्हणून स्वतःसाठी व शिपाई सचिन शिवरामवार यासाठी ४०० रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडले.
याप्रकरणी शिक्षक शिंदे याची अंगझडती घेतली असता रोख ६५० रुपये, एक मोबाईल, दोन चांदीच्या अंगठी आणि एक ग्रॅम सोन्याचा तुकडा असा ऐवज मिळून आला तर शिपाई सचिन शिवरामवार याच्याकडे रोख १५९० रुपये, एक मोबाईल, आधार कार्ड आदी ऐवज सापडला. दोन्ही आरोपींच्या घराची झडती सुरू आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जात आहे.



