
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/akfhrchj/nandedscript.com/wp-includes/formatting.php on line 4740
नांदेड – लातूरहून नांदेडमार्गे मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे नेण्यात येणारे तब्बल ३६ लाखाचे १ हजार ४७० किलो चंदन लोहा येथे रविवारी पहाटे जप्त केले. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने सापळा लावून केलेल्या या कारवाईत एकूण ५१ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रिकाम्या दिसणाऱ्या ट्रक मध्ये सहा फूट उंचीचा एक विशेष कप्पा बनवून ही चंदन तस्करी केली जात होती.
लातूर येथून मध्य प्रदेशातील बुरहानपुर कडे एका आयशर ट्रक मधून चंदनाची वाहतूक होत असल्याची माहिती उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस ठाणे हद्दीतील लोहा ते नांदेड रस्त्यावरील सई हॉटेलजवळ रविवारी पहाटे आयशर ट्रकला थांबवले. प्रथमदृष्ट्या हा ट्रक रिकामा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अधिक तपासणी केली असता आयशर ट्रकच्या बॉडीमध्ये ड्रायव्हरच्या पाठीमागील साधारणत: तीन फूट जागेत सहा फूट उंचीचा एक विशिष्ट कप्पा बनविण्यात आला होता. या कप्प्यातून चंदनाने भरलेल्या गोण्या बाहेर काढल्या. त्या गोण्यामध्ये १ हजार ४७० किलो वजनाचे म्हणजेच ३६ लाख ७६ हजार रुपयांचे चंदन आढळून आले. हे सर्व चंदन जप्त करण्यात आले आहे. या ट्रकमध्ये चालक असलेल्या तौफिक चांद पाशा देशमुख रा. चापोली जि. लातूर याच्यासोबत तुकाराम शेषराव बुंदराळे रा. आनंदवाडी ता. चाकूर हे होते.
त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता सदर चंदनाचे लाकूड उदगीर, आनंदवाडी, चापोली आणि केज जि. बीड येथून रामदास शेषराव बुंदराळे रा. आनंदवाडी आणि बाळासाहेब जाधव रा. केज जि. बीड यांनी वाहनात भरून दिल्याचे सांगितले. याप्रकरणी तुकाराम शेषराव बुंदराळे रा. आनंदवाडी ता. चाकूर, तौफिक चांद पाशा देशमुख रा. चापोली, रामदास शेषराव बुंदराळे रा. आनंदवाडी ता. चाकूर जि. लातूर, बाळासाहेब जाधव रा.अहिल्यानगर ता. केज जि. बीड आणि शंकर तानाजी मानपाडे उर्फ जाधव या पाच जणांविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास लोहा ठाण्यातील उपनिरीक्षक पांचाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या कारवाईत पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ, पोकॉ कामाजी गवळे यांचा समावेश होता. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी आणि अंमलदाराचे अभिनंदन केले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/akfhrchj/nandedscript.com/wp-includes/formatting.php on line 4740



