क्राईम

नांदेडमधील साईलाला गॅंगवर मोक्काचा प्रस्ताव..!

नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या कार्यालयात १२ जणांवर मोक्काचा प्रस्ताव सादर, साईलालासह शाहरुख उर्फ कबुतरचाही समावेश

नांदेड – शहरातील भारत ई-स्क्वेअर जवळ अर्जितसिंग या गुन्हेगाराचा खून करणाऱ्या साईलाला गॅंगवर भाग्यनगर पोलिसांनी मोक्काचा प्रस्ताव पाठविला आहे. साईसिंग उर्फ साईलाला दीपकसिंग गहेरवार, शाहरुख उर्फ कबूतर शेख अजगर यांच्यासह बारा जणांविरुद्ध हा प्रस्ताव नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत संघटित गुन्हेगारीवर नांदेड पोलीस दलाचा हा एक मोठा प्रहार मानला जात आहे.

नांदेड शहरात आणि जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींची यादी टू प्लस स्कीमअंतर्गत तयार केली आहे. या गुन्हेगाराविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याची बाब निदर्शनात आल्याने सर्व पोलीस ठाणेदाराकडून सराईत गुन्हेगारावर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.

भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत ४ एप्रिल रोजी अर्जित सिंगच्या खून प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये साईसिंग उर्फ साईलाला दीपकसिंग गहेरवार रा. बालाजी मंदिर कमानजवळ सिडको, जयकुमार उर्फ सोनू कैलास राऊत रा. सुमेधनगर नांदेड, शाकेर खान रशीद खान रा. मिल्लतनगर, शेख शाहरुख उर्फ कबूतर शेख अजगर रा. खुदबईनगर चौरस्ता महबूबिया कॉलनी नांदेड, शेख उबेद शेख अजगर रा. फेमस फंक्शन हॉलजवळ मिल्लतनगर नांदेड, दिग्विजय गणेशराव नारागुडे रा. सावित्रीबाई फुले शाळेजवळ श्यामनगर नांदेड, मन्मथ वसंतराव मंगरुळे रा. नायगाव, नितेश परमेश्वर इंगळे रा. शिवनगर हनुमान मंदिराजवळ, गौरव दीपकसिंग गहेरवार रा. शक्तीनगर, इलियाज उर्फ काला इल्लूखान इस्माईल खान रा. खुदबईनगर चौरस्ता नांदेड या दहा जणांसह अर्जित सिंग खुनाच्या घटनेवेळी प्रतिहल्ल्यात मरण पावलेले सय्यद आवेज सय्यद खलील रा. खुदबेनगर चौरस्ता आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख रा. ईदगाह मैदान इतवारा या दोघांचाही समावेश आहे.

या गुन्ह्यातील आरोपी हे स्वतःच्या आर्थिक लाभापोटी संघटित गुन्हे करत असल्याने सदर टोळीने एकापेक्षा अधिक संघटितपणे गुन्हे केले आहेत. टोळी प्रमुख साईसिंग उर्फ साईलाला याच्याविरुद्ध न्यायालयात एकापेक्षा अधिक दोषारोप पत्र दाखल आहेत. त्याची न्यायालयाने दखल घेतलेली आहे. त्याच्याविरुद्ध असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने दखल घेऊन केलेल्या कारवाईचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. साई लालाने त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यातून जामीनावर सुटून आल्यानंतर आपल्या संघटित साथीदारांसह पुन्हा संघटित होऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असल्याचे निदर्शनात येत आहे. साईलाला आणि त्याच्या टोळीतील इतर गुन्हेगारावर नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदर संघटित गुन्हेगारांच्या कृत्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होत आहे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत आहे या टोळीचे कार्यक्षेत्र व्यापक असून त्यांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवून त्यांचे आश्रयस्थान शोधणे आणि त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर साईलाला गॅंगच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ प्रमाणे प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे ४ एप्रिल घडलेल्या अर्जीत सिंगच्या खुनातील गुन्ह्यात उपरोक्त १२ आरोपीविरुद्ध मोक्का कलमाचा अंतर्भाव करून पुढील तपास करण्याकरिता नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे हा प्रस्ताव भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दाखल केला आहे.

ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत सराईत गुन्हेगार, संघटित गुन्हेगारीवर एमपीडीए, मोक्का अंतर्गत प्रभावी कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यामध्ये आणखी काही गुन्हेगारांवर ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत मोक्का, एमपीडीए तसेच हद्दपार आदी कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!