नांदेड जिल्हा

नांदेडला पुन्हा एकदा पूर परिस्थितीचा धोका..!

जायकवाडी, माजलगावसह जालना, परभणीतील पाणीप्रवाह नांदेडकडे, विष्णुपुरी प्रकल्पाचे १५ दरवाजे उघडले, प्रकल्पातून २ ते सव्वा दोन लाख क्युसेसपर्यंत विसर्ग वाढवावा लागण्याची शक्यता 

नांदेड – गोदावरी नदीत जायकवाडी, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वरसह परभणी आणि जालना जिल्ह्यात झालेल्या पावसाचे पाणी येत असल्याने नांदेड येथील विष्णूपुरी प्रकल्पातून १ लाख ८१ हजार ६९१ क्युसेस विसर्ग गोदावरी पात्रात केला जात आहे. त्याचवेळी विष्णूपुरी प्रकल्पात वरील धरणातील पाण्याचा सुरू असलेला येवा पाहता हा विसर्ग आणखी वाढवून तो दोन लाखापर्यंत न्यावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदेडला आता पुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती, नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली. गोदावरी काठावरील गावातील नागरिकांनीही खबरदारी बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
गेल्या १७ सप्टेंबर रोजी विष्णुपुरी प्रकल्पातून १ लाख ८० हजार क्युसेस वेगाने पाणी विष्णूपुरी प्रकल्पातून सोडण्यात आले होते. त्यावेळी नांदेडमध्ये गोदावरी नदीची पाणीपातळी जवळपास धोकादायक स्थितीत पोहोचली होती. सोमवारी रात्रीपासून विष्णूपुरी प्रकल्पात येणारा पाण्याचा येवा वाढला आहे. जायकवाडी, माजलगावसह जालना, परभणी जिल्ह्यात झालेल्या पावसाचे पाणी गोदावरी पात्रात येत आहे. विष्णूपुरी प्रकल्पाचे सध्या १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. १ लाख ८१ हजार ६९१ क्युसेस वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. जुन्या नांदेडातील नावघाट पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. परिणामी जुन्या नांदेड आणि नवीन नांदेडचा या पुलावरून होणारा संपर्क तुटला आहे. २२ व २३ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. नांदेड शहर आणि परिसरात पाऊस झाला तर परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.

नवीन नांदेडात वसरणी भागातील नाल्यात बॅकवॉटरचे पाणी पुन्हा शिरले असून पंचवटी नगरातील नागरिकांना हलवावे लागेल, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी जुन्या नांदेडातील गाडीपुरा भागातील कालापूल परिसरातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे शहरातील काही भागात आता निवारा केंद्र उघडावे लागतील. त्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हालचाली सुरू आहेत. महापालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी दिलेल्या आदेशानंतर शहरात ६ निवारा केंद्र स्थापन केले आहेत. विष्णूपुरी प्रकल्पातून सध्या सुरू असलेल्या १ लाख ८१ हजार ६९१ क्युसेसचा विसर्ग दोन ते सव्वा दोन लाखापर्यंत नेण्याची परिस्थिती उद्भवल्यास गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडेल हे निश्चित. त्यामुळे नांदेड शहरातील सखल भागातील नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागणार आहे. महापालिकेकडून मंगळवारी रात्री शहरातील अनेक भागात खबरदारी घेण्याबाबत जाहीर आवाहनही केले जाणार आहे.

शहरी भागातील या उपाययोजनांसह सीमावर्ती भागाला पुराचा फटका बसू नये यासाठी तेलंगणातील पोचमपाड धरणातूनही विसर्ग वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निजामाबाद प्रशासनाशी संपर्क साधला आहे. नांदेड जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नांदेड आणि निजामाबाद प्रशासनातील अधिकाऱ्यांचा प्रारंभापासून असलेला हा समन्वय अतिशय उपयुक्त ठरत आहे. त्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कर्डिले यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. मंगळवारी उद्भवलेल्या पूर परिस्थितीबाबत नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनीही सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!