क्राईम

नवीन नांदेडातील कौठा खून प्रकरणात तिघेजण पाच तासात जेरबंद..!

नांदेड ग्रामीण पोलिसांची कामगिरी, दोन वर्षांपूर्वीच्या वादातून चालकाचा केला होता शुक्रवारी रात्री खून..!

नांदेड – दोन वर्षापूर्वी चुलत भावाच्या पत्नीला पळवून नेल्याचा राग मनात ठेवून नवीन नांदेडमध्ये कौठा भागातील बसवेश्वर नगरात एका ३५ वर्षीय चालकाचा खंजीरने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेतील तीन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांनी पाच तासात जेरबंद केले. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक गुप्त खबऱ्यामार्फत आरोपींचा माग काढला आणि त्यांना गजाआड केले.

नवीन नांदेडातील वसरणी भागातील भाग्यश्री सोसायटी येथे राहणाऱ्या नरेश बालाजी पवार (वय ३५ ) हा शुक्रवारी रात्री मित्रांना भेटण्यासाठी कौठा भागात गेला होता. रात्री ९.४५ च्या सुमारास बसवेश्वरनगर भागातील चक्कीजवळ त्याच्यावर राधेश्याम उर्फ लिंबा प्रल्हाद गोंदवड, गजानन घनश्याम गोंदवड आणि रामेश्वर रमेश गोंदवड या तिघांनी धारदार खंजीरने वार करत प्राणघातक हल्ला केला. घटनेनंतर हे तिघेही पसार झाले होते. जखमी नरेश पवार याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तातडीने तपासाची चक्र फिरवण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशान्वये विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा माग काढण्यासाठी तातडीने वेगवेगळे विशेष पथके रवाना करण्यात आली. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक गुप्त खबऱ्यामार्फत आरोपींच्या हालचालीची माहिती मिळवली. त्यावरून गुन्ह्यातील आरोपी राधेश्याम उर्फ लिंबा प्रल्हाद गोंदवड, गजानन घनश्याम गोंदवड आणि रामेश्वर रमेश गोंदवड या तिघांनाही नांदेड जिल्ह्याबाहेरून पोलिसांनी पाच तासात जेरबंद केले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तारू हे करीत आहेत.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण व त्यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस जमादार राजू जंकूट, विठ्ठल भिसे, गुरुनाथ कारामुंगे, शेख जमीर, जाधव, हनवता, कदम, शेख गफार, भगवान टिपरसे, संतोष पवार, कल्याणकर, कांबळे, शेख आसिफ, माळगे तसेच सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर आणि दीपक ओढणे यांनी पार पाडली.

दोन वर्षापूर्वीच सोडले होते कौठा..! दोन वर्षांपूर्वी नरेश बालाजी पवार आणि अभिषेक गोंदवड यांची पत्नी हे दोघे पळून गेले होते. त्या कारणावरून त्यावेळी मोठा वाद झाला होता. या वादानंतर नरेश पवारने कौठा सोडले. तो आपल्या कुटुंबियांना घेऊन वसरणी येथील भाग्यश्री सोसायटी येथे राहत होता. तो पिकअप गाडी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. कौठा येथे राहत असताना त्याचे जुने मित्र तेते होते. त्यामुळे श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी शुक्रवारी तो उदगीर येथे भाड्याचे सामान टाकून परत आला. रात्री ९ च्या सुमारास तो आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी कौठा भागात गेला आणि तिथेच घात झाला. तयारीत असलेल्या राधेश्याम उर्फ लिंबा गोंदवड, गजानन गोंदवड आणि रामेश्वर गोंदवड या तिघांनी त्याच्यावर खंजीरने जीवघेणा हल्ला केला आणि यातच त्याचा जीव गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!