क्राईम

नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीवर जीवघेणा हल्ला..! 

भाग्यनगर रस्त्यावर तरुणीवर खंजीरने केले तीन वार, तरुणीची प्रकृती चिंताजनक, घटनास्थळी नागरिकांनीच हल्लेखोराला पकडले अन् चोप देत केले भाग्यनगर पोलिसांच्या हवाली

नांदेड – नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा चाकूहल्ला झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणात हल्लेखोर युवकाला भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे नांदेडमधील विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नांदेड शहरातील भाग्यनगर ते अशोकनगर या रस्त्यावर सोमवारी दुपारी एका १९ वर्षीय तरुणीला रोहित शिवाजी पोहरे हा युवक बोलण्याचा प्रयत्न करत होता; मात्र यावेळी तरुणीने त्याला बोलण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या रोहित पोहरे याने त्या तरुणीवर थेट चाकूहल्ला केला. त्याने चाकूचे तीन वार त्या तरुणीवर केले. यामध्ये सदर तरुणी गंभीर जखमी झाली. हा प्रकार पाहताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सजगता दाखवत हल्लेखोर युवकाला ताबडतोब पकडले. त्याला जोरदार चोप देऊन पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्या युवकाला भाग्यनगर ठाण्यात नेण्यात आले. त्याचवेळी गंभीर जखमी झालेल्या तरुणीला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही पुढे आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी माहिती देताना सदर प्रकरणात रोहित पोहरे हा तरुण त्या तरुणीच्या ओळखीचा होता. तो तिला एकतर्फी प्रेमातून रस्त्यावर बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी त्याला बोलण्यास तरुणीने नकार दिल्यामुळे रोहितने चिडून हा हल्ला केल्याचे सांगितले. रोहित पोहरे हा सदर तरुणीच्या ओळखीचा होता. गेल्या काही दिवसापासून तो तिच्या मागे असल्याची माहितीही पुढे आली आहे. विशेष म्हणजे त्याला या प्रकरणात नातेवाईकांनी समजावूनही सांगितले होते; मात्र तो ऐकायला तयार नव्हता. या एकतर्फी प्रेमातूनच त्याने हा जीवघेणा हल्ला त्या १९ वर्षीय तरुणीवर केला आहे. जखमी अवस्थेत ती आता मृत्यूशी झुंज देत आहे.

नांदेडकरांनी दाखवली समय सूचकता…रस्त्यावर कुठेही होत असलेला तरुण तरुणी, महिला पुरुष यांच्यामधील वाद हा आता खाजगी मॅटर असल्याचे सांगत अनेक नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाजात दिसत आहे; मात्र नांदेडमध्ये भाग्यनगर येथे मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेत नांदेडकरांनी समय सूचकता आणि सजगता दाखवत घटनास्थळी तात्काळ त्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या. इतकेच नव्हे तर त्याला चांगलाच चोपही दिला. नागरिकांनी घटनेची माहिती देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले. आता त्याच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा घटनेत नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे.समय सूचकता दाखविणे अत्यंत गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!