
नांदेड – नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह आपल्या सहकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून सहशिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह पुणेगाव येथे गोदावरी नदीत कार टाकून १७ जुलै रोजी आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर सुनील मोरे यांच्या पत्नी तथा सहशिक्षिका धम्मशिला मोरे-कौठेकर या नेमक्या कुठे आहेत..? त्या माध्यमांसमोर का येत नाहीत..? या प्रकरणात त्यांची एकही प्रतिक्रिया का आली नाही? असे एक ना अनेक प्रश्न पुढे आले; मात्र या सर्व प्रश्नांना आता विराम मिळाला आहे. पती आणि दोन मुलांच्या मृत्यूच्या धक्क्याने शेवटपर्यंत सावरू न शकलेल्या धम्मशिला मोरे-कौठेकर यांचाही अखेर मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर नांदेडमध्ये सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेल्या सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन लहान मुलांसह गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केल्याची घटना १७ जुलै रोजी घडली होती. या आत्महत्येपूर्वी सहशिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या मृत्यूस हदगावचे गटशिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी दत्ता विश्वंभर पवळे कारणीभूत असल्याचे व्हाट्सअप स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस पाहून अनेकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी मृत्यूस कवटाळले. या प्रकरणात पुढे मयत सुनील मोरे यांच्या विरुद्धही मुलांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्या मुलांवर हा चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप नारायण मोरे यांनी आपल्या उपोषणादरम्यान केला होता. दुसरीकडे ॲट्रॉसिटीसह इतर विविध कलमान्वये गटशिक्षणाधिकारी फोले, विस्तार अधिकारी बाचे, केंद्रप्रमुख कदम आणि सहशिक्षक पवळे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
या घटनेने संपूर्ण राज्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यामुळे आता या प्रकरणात गंभीर कारवाई होईल, अशी भाबडी अपेक्षा राज्यातील जनतेने केली होती; मात्र प्रत्यक्षात नांदेड जिल्हा परिषदेने कोणती कारवाई केली ना जिल्हा पोलीस दलाकडून अपेक्षित कारवाई झाली. मोरे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल झालेल्या चारही जणांना अटकपूर्व जामीन मिळाला. इतकेच नव्हे तर १ सप्टेंबर २०२६ रोजी हे चौघेही आपापल्या पदावर रुजू झाले होते. त्यामुळे ना जिल्हा परिषदेकडून निलंबनाची कारवाई झाली ना पोलिसांकडून अटकेची कारवाई. एकूणच या प्रकरणातील राजकीय वरदहस्त पाहता कारवाई होणे अपेक्षित नव्हतेच. मयत सुनील मोरेचे वडील नारायण मोरे हे स्वतः भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस आधी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसले; मात्र त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल गेंड्याची कातडी झालेल्या जिल्हा प्रशासनाकडून घेतली गेली नाही.
एकूणच सर्वच बाजूने या प्रकरणात सुनील मोरे आणि त्यांच्या दोन मुलांच्या मृत्यूची अवहेलनाच झाली. या संपूर्ण प्रक्रियेत घटनेच्या प्रक्रियेत सुनील मोरे यांच्या पत्नी धम्मशिला मोरे-कौठेकर या कुठेच पुढे आल्या नव्हत्या. त्या पुढे का येत नाहीत? कोणतीही प्रतिक्रिया का देत नाहीत असा सवालही उपस्थित केला जात होता. अनेकांनी या प्रकरणात वेगळेच काहीतरी कारण असावे असा अंदाज व्यक्त करीत होते; मात्र शेवटपर्यंत शिक्षिका असलेल्या धम्मशिला मोरे-कौठेकर या पुढे आल्या नाही. अखेर त्या काळाच्या आड गेल्याचीच बातमी पुढे आली. पती आणि आपल्या दोन मुलांच्या मृत्यूचा आघात त्यांच्या मनावर किती खोलवर झाला होता याचा अंदाज त्यांच्या मृत्यूने तरी समाज व्यवस्थेला आला की नाही? हा प्रश्नही मागे उरला आहे. त्यामुळे मोरे कुटुंबातील शेवटच्या या सदस्याचाही आज अंत झाला.
संपूर्ण राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात चर्चेस आलेल्या या घटन प्रकरणी काहीतरी कारवाई होईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटीलही याच कालावधीत नांदेडमध्ये रुजू झाले होते. पुण्याहून ते नांदेडला आले होते शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुणे ओळखले जाते. शिक्षण क्षेत्राला गालबोट लावणाऱ्या घटनेप्रकरणी ते कठोर कारवाई करतील, असे वाटत होते; मात्र शेवटी तेही व्यवस्थेपुढे नमले. एक साधी नोटीसही त्यांनी गुन्हा दाखल झालेल्या चौघांना दिली नाही. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन हेही देशामध्ये अनेक ठिकाणी काम करून नांदेडला रुजू झाले होते. त्यांच्यापुढेही कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता; मात्र या घटनेचा तपास चौकशी अधिकारी करत आहेत. ते सीनियर आहेत. ते योग्य दिशेने तपास करीत असल्याचे सांगून त्यांनीही हात वर केले होते. या प्रकरणातील चौकशी अधिकारी इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनीही आम्ही खूप प्रयत्न केले न्यायालयाने जामीन दिल्याचे सांगितले विशेष म्हणजे या प्रकरणातील गटशिक्षणाधिकारी असलेल्या किशन फोले याच्याविरुद्ध यापूर्वीही एका शिक्षकाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला असल्याची बाब न्यायालयापुढे ठेवण्यात आली होती. असे असतानाही चौघानाही अटकपूर्व जामीन मिळाला. खुद्द सुनील मोरे यांनी मृत्यूपूर्वी या चारही जणांविरुद्धचे सर्व पुरावे मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये असल्याचे सांगितले होते; मात्र तो फोन आणि लॅपटॉपही अद्याप उघडला नाही. उघडला नाही का उघडू दिला नाही? हा प्रश्नही आता पुढे येत आहे. नांदेड जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक संघटना आहेत. या संघटनांची संख्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्यादरम्यान लक्षात येते; पण यातील एखाद अपवाद वगळता शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या दबावाखाली येत मोरे कुटुंबीयांच्या मृत्यूचा साधा निषेध करण्याचेही औदार्य दाखविले नाही. यातून शिक्षक हा किती समाजशील प्राणी आहे हे स्पष्ट झाले. या चौघांच्या मृत्यूनंतरही मोरे कुटुंबीयांना कोणताही न्याय नांदेड जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल, जिल्ह्यातील राजकीय नेते, शिक्षक संघटना ना समाजाकडून मिळू शकला.
मयत सुनील मोरे हे भोकर तालुक्यातील बेंबर येथील मूळचे रहिवासी होते. १७ जुलै रोजी घडलेल्या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण, भोकरच्या आमदार ॲड. श्रीजया चव्हाण यांनी मोरे यांच्या नांदेड येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यामुळे या घटनेत योग्य तपास होईल, अशी अपेक्षा होती पण ती प्रत्यक्षात फोल ठरली. या घटनेत नांदेड जिल्ह्यातील दोन आमदारांनी कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांसह जिल्हा परिषद प्रशासनावरही यांना त्या मार्गाने दबाव आणल्याचेही सांगितले गेले. या सर्व पार्श्वभूमीवर मोरे कुटुंबियातील शेवटची व्यक्ती असलेली धम्मशिला मोरे-कौठेकर यांचाही सोमवारी अंत झाला आहे. त्यामुळे मोरे यांना मृत्यूनंतर तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. ती पण आता संपुष्टात आली आहे.
मयत सुनील मोरे हे भोकर तालुक्यातील बेंबर येथील मूळचे रहिवासी होते. १७ जुलै रोजी घडलेल्या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण, भोकरच्या आमदार ॲड. श्रीजया चव्हाण यांनी मोरे यांच्या नांदेड येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यामुळे या घटनेत योग्य तपास होईल, अशी अपेक्षा होती पण ती प्रत्यक्षात फोल ठरली. या घटनेत नांदेड जिल्ह्यातील दोन आमदारांनी कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांसह जिल्हा परिषद प्रशासनावरही यांना त्या मार्गाने दबाव आणल्याचेही सांगितले गेले. या सर्व पार्श्वभूमीवर मोरे कुटुंबियातील शेवटची व्यक्ती असलेली धम्मशिला मोरे-कौठेकर यांचाही सोमवारी अंत झाला आहे. त्यामुळे मोरे यांना मृत्यूनंतर तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. ती पण आता संपुष्टात आली आहे.


