नांदेड स्क्रिप्ट विशेष

नांदेडमध्ये विष्णूपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे तब्बल २५ वर्षानंतर उघडले..!

गोदावरी नदीत १ लाख ९० हजार क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू, गोदावरी नदीची नांदेड शहरात धोक्याच्या पातळीकडे वाटचाल, विष्णूपुरी प्रकल्पाच्या एका दरवाजाचे दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर

नांदेड – छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडीसह बीडमधील माजलगाव, सिद्धेश्वर, खडकपूर्णा, निम्न दुधना यासह अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ही परिस्थिती पाहता नांदेड जिल्ह्यावर पुराचे मोठे संकट ओढवले आहे. विष्णूपुरी प्रकल्पात येणारा पाण्याचा येवा लक्षात घेता विष्णूपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्गही त्याच प्रमाणात केला जात आहे. परिणामी गोदावरी नदी आता नांदेड शहरात धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले असून आता नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तब्बल २५ वर्षानंतर विष्णूपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. आणखी एक १७ वा दरवाजाही उघडावा लागणार आहे. २००६ च्या महापुरातही प्रकल्पाचे केवळ १४ दरवाजे उघडण्यात आले होते.
विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील जायकवाडी प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, सिद्धेध्वर प्रकल्प, निम्न दुधना व खडकपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्याने सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. तसेच नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट असल्याने अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पामध्ये सध्या २ लक्ष क्युसेस येवा सुरू आहे. हा येवा पुढील ६-७ तासात येवा ३ लाख क्युसेसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या विष्णूपुरी धरणातून १ लाख ८९ हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात आला आहे. हा विसर्ग वाढवून अडीच ते तीन लाख क्युसेस इतका वाढण्याची शक्यता असल्याने नांदेड शहरालगत गोदावरी नदीची पातळी इशारा पातळी ३५१.०० मीटरच्या वर जावून धोका पातळी ३५४.० मीटर गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागातील नागरिक आणि व जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.

गोदावरी नदीत आजघडीला अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूर्णा, दुधना, येलदरी, सिद्धेश्वर या धरणातील पाणीही सोडण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील सिंदफणा, पुंडलिका नद्यांसह इतर उपनद्याही गोदावरी नदीला मिळतात. या नद्यांनाही मोठा पूर आला आहे. गेल्या पंचवीस वर्षात विष्णुपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे पहिल्यांदाच उघडण्यात आले आहेत २००६ मध्ये आलेल्या महापुरातही प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आता संपूर्ण मराठवाड्यासह नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हा सर्व विसर्ग गोदावरी नदीत होत आहे. गोदावरीच्या माध्यमातून पुढे पोचमपाडमार्गे तो समुद्रात विलीन होतो. मराठवाड्यात पहिल्यांदाच संपूर्ण धरणे ओसंडून वाहत असून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

विष्णूपुरी प्रकल्पाच्या गेट क्रमांक १ ची दुरुस्ती…विष्णूपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू असताना विसर्गही वाढविणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पाचा क्रमांक एकचा दरवाजा तांत्रिक दृष्ट्या बिघडल्याने या दरवाजाची दुरुस्ती जलसंपदा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर मंगळवारी रात्री सुरू केली होती. कार्यकारी अभियंता दत्तात्रय सावंत यांच्यासह उपअभियंता नवनाथ पिसोटे, शाखा अभियंता सागर कदम, शिवम ससाने, कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड, अरुण अंकुलवार, कनिष्ठ अभियंता बागवान आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले जात होते. यांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता जी.एम  घंटावार आणि अधीक्षक अभियंता प्रशांत देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूपुरी प्रकल्पाच्या क्रमांक एकच्या दरवाजाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!