महापालिका

नांदेडमध्ये अपक्ष नगरसेविका मीनल पाटील यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस..!

महापालिकेच्या तरोडा- सांगवी क्षेत्रीय कार्यालयात २८ सप्टेंबर रोजी सुनावणीस हजर राहण्याचे दिले निर्देश, विमानतळ प्राधिकरणाकडून दिलेल्या नाहरकतीपेक्षा जादा बांधकाम, महापालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षाही केले जादा बांधकाम, सुरक्षित विमान वाहतुकीसाठी नांदेड विमानतळ संचालकांचे महापालिका आयुक्तांना पत्र..!

नांदेड – नांदेड विमानतळाच्या रन वे क्षेत्रालगत अनधिकृतरित्या बांधकाम केल्याबाबत नांदेड महापालिकेतील अपक्ष नगरसेविका मीनल गजानन पाटील यांच्यासह गजानन तुकाराम पाटील यांना नांदेड महापालिकेच्या तरोडा सांगवी क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मंजूर नकाशाविरुद्ध अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून मीनल पाटील व गजानन पाटील यांना २८ सप्टेंबर रोजी आपली बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहण्यासही सांगितले आहे. महापालिकेने दिलेल्या या नोटीसमुळे नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळाच्या फनल झोनमध्ये संरक्षण भिंती लगत रनवे क्षेत्रामध्ये गजानन तुकाराम पाटील आणि मीनल गजानन पाटील यांचा भूखंड आहे. या भूखंडावर आरसीसी स्वरूपाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम महापालिकेच्या मंजूर नकाशाविरुद्ध करण्यात आले आहे. या अनधिकृत बांधकामप्रकरणी नांदेड महापालिकेने पाटील यांना १ जून २०२६ रोजी कलम ५३ (१) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. तरोडा – सांगवी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी या प्रकरणात दिलेल्या नोटिस अनुसार ज्याप्रमाणे परवानगी दिली आहे त्याप्रमाणे बांधकाम करण्यात आले नाही. विकास करण्यासाठी दिलेली परवानगी नाकारण्यात आलेली असतानाही बांधकाम करण्यात आले. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत इमारतीचे बांधकाम पाडण्यात यावे, अनधिकृत उपयोग बंद करावा तसेच बांधकाम बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. महापालिकेने केलेल्या पाहणीत ग्राउंड फ्लोअरवर २४६.०४९ चौरस मीटर अनाधिकृत बांधकाम करण्यात आले आहे तर फर्स्ट फ्लोअरवर २३९.५११ आणि सेकंड फ्लोअरवर २५६.२११ चौरस मीटर इतके अनधिकृत बांधकाम असल्याचेही स्पष्ट झाले. यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने महापालिकेने २१ सप्टेंबर २०२६ रोजी नोटीस देत गजानन पाटील आणि मीनल पाटील यांना सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत कळविले आहे. त्यात मालकी हक्काबाबतच्या आवश्यक कागदपत्रांसह २८ सप्टेंबर रोजी उपस्थित राहून आपली बाजू मांडावी, सुनावणीस गैरहजर राहिल्यास आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरून आपल्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. कडून नांदेड विमानतळ संचालकांनी विमान वाहतूक सुरक्षिततेच्या आणि सुरक्षित व नियमित वाहतुकीच्या हितासाठी या प्रकरणात नांदेड महापालिका आयुक्तांना एक पत्र लिहून या बांधकाम प्रकरणात आपण त्वरित हस्तक्षेप करण्याबाबत कळविले आहे. त्यात आतापर्यंत झालेल्या पत्रव्यवहाराच्या संदर्भात, पुन्हा एकदा आपल्या निदर्शनास आणून देताना भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जारी केलेल्या ना हरकत प्रमाणपत्रात दिलेली मर्यादा गजानन पाटील व मीनल पाटील यांच्या बांधकामात ओलांडत असल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट केले आहे. विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा येथे तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी असेही महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे कळविण्यात आले. एकूणच या प्रकरणाचे गांभीर्य पाहता आयुक्तांकडून आता तातडीने पावले उचलण्यात येत आहेत. २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणी दरम्यान गजानन पाटील आणि अपक्ष नगरसेविका मीनल पाटील या नेमकी काय भूमिका मांडतात याकडेही आता लक्ष लागले आहे.

…तर अपक्ष नगरसेविका मीनल पाटील यांचे नगरसेवक पद होऊ शकते रद्द ! नगरसेवक पदावर असताना अनधिकृत किंवा बेकायदेशीर बांधकाम केले तर संबंधित नगरसेवकाचे पद रद्द होऊ शकते तसेच तो आगामी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतो महाराष्ट्र महापालिका कायदा १९४९ च्या कलम १० (१ ड ) नुसार एखाद्या सदस्याने किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केले असेल तर तो सदस्य पद धारण करण्यास किंवा नगरसेवक होण्यास पात्र राहत नाही. त्यामुळे गजानन पाटील आणि मीनल पाटील हे या प्रकरणात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले तर अपक्ष नगरसेविका मीनल पाटील यांचे नगरसेवक पद रद्दही होऊ शकते. अशा प्रकरणात कोणतीही त्रयस्थ किंवा बाधित व्यक्ती नगरसेवकाच्या अशा अनधिकृत बांधकामा विरोधात आणि अपात्रतेबाबत कायदेशीर तक्रारही दाखल करू शकते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!