नांदेड जिल्हा

नांदेड शहरातील १२ गुन्हेगार हद्दपार..!

सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नांदेड उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांचे आदेश, नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील पाच, वजीराबाद तसेच शिवाजीनगर ठाणे हद्दीतील प्रत्येकी तीन तर भाग्यनगर ठाणे हद्दीतील एका गुन्हेगाराचा गुन्हेगारांचा समावेश 

नांदेड – श्री गणेश विसर्जनासह आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर व परिसरात शांतता, सुव्यवस्था कायम रहावी या अनुषंगाने नांदेड शहरातील तब्बल १२ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश नांदेड उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या प्रस्तावानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील पाच, शिवाजीनगर आणि वजीराबाद ठाणे हद्दीतील प्रत्येकी तीन तर भाग्यनगर ठाणे हद्दीतील एका गुन्हेगाराचा यामध्ये समावेश आहे.

टोळ्या बनवून रात्री, अपरात्री धारदार शस्त्र व खंजीर बाळगून फिरणे, एकट्या नागरिकांना, रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व दुकानदारांना अडून धमकावणे, खंडणी मागणे, मारहाण करणे अशा गुन्हेगारी कृत्यांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरात घुसून मारहाण, दंगल आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १२ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातील दोन गुन्हेगार हे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यातून तर दहा गुन्हेगार हे नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहेत.

आगामी सण उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध कडक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘टू प्लस’ स्कीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार नांदेडचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी हद्दपारीचे हे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार १२ सराईत गुन्हेगारांना चार महिन्यांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने आणि इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून सदर गुन्हेगारांना एका वर्षासाठी हद्दपार करण्याची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रोहन यांच्यामार्फत नांदेड उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे केली होती. प्राप्त अहवाल आणि पुराव्यांचे अवलोकन करून उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सदरील १२ गुन्हेगारांना चार महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे अंतिम आदेश पारित केले आहेत.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील अविनाश सोम भारती रा. विष्णुपुरी, सय्यद सलमान उर्फ भुऱ्या सय्यद बाबूमिया रा. फिरदोस नगर हडको, रणज्योतसिंघ उर्फ बच्चूसिंघ सतनामसिंघ बावरी रा. गोविंद कॉलनी, शुभम दत्ता सुनेवाड रा. विष्णुपुरी आणि आकाश रमेश चितळे रा. विजयनगर, सिडको या पाच जणांचा समावेश आहे. शिवाजीनगर ठाणे हद्दीतील यश उर्फ पिल्लू गौतम जोंधळे रा. क्रांतीनगर, सुबोध अनिल गजभारे रा. आंबेडकर नगर आणि प्रशिक मिलिंद केळकर रा. लेबर कॉलनी या तिघांचा समावेश आहे. वजीराबाद ठाणे हद्दीतील श्रीनिवास उर्फ आदू अनिल जाधव रा. दिलीपसिंग कॉलनी, प्रेमज्योतसिंग उर्फ सोनू तोपची रा. चिखलवाडी आणि सुरज उर्फ सुरज्या अरविंद हटकर रा. देगावजाळ या तिघांचा समावेश आहे. भाग्यनगर ठाणे हद्दीतील वैभव महेंद्र सूर्यतळे रा. साफल्यनग, यश नगरी या एका गुन्हेगाराचाही समावेश या हद्दपारीमध्ये आहे. वैभव सूर्यतळे आणि यश उर्फ पिल्लू गौतम जोंधळे या दोघांना नांदेड परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे तर इतर दहा गुन्हेगार हे नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!