
नांदेड – जिल्ह्यात एकीकडे दुष्काळाची छाया गडद होत असतानाच आता भूकंपाचे नवे संकटही उभे राहिले आहे. नांदेडसह हिंगोली जिल्हा शनिवारी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी भूकंपाचा मध्यम सौम्य धक्क्याने हादरला. या धक्क्याची नोंद रिश्टर स्केलवर ४.०५ इतकी नोंदवली आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन महिन्यापासून भूकंपाची मालिका सुरू आहे. त्यात आता नांदेडही हादरले आहे. शनिवारी सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनीही ३.०३ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का हिंगोली जिल्ह्यात झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा हे या भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवारी सकाळी ७.४६ व ९.४३ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार, या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ३.०३ व ४.०५ इतकी नोंदविण्यात आली आहे. या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितरीत्या घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, शेजारील हिंगोली जिल्ह्यात दोन महिन्यांच्या शांततेनंतर भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू झाले असून संपूर्ण जिल्हा जोरदार धक्क्याने हादरला आहे. शनिवारी (३ ऑक्टोबर) सकाळी ७:४७ वाजता ३.३ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा हे या भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे.१ ऑक्टोबर गुरुवारी रात्री ९:४१ वाजता पांगरा शिंदे व परिसरात भूकंपाचा पहिला धक्का बसला होता, मात्र त्याची अधिकृत नोंद झाली नव्हती. त्यानंतर ४८ तासांच्या आतच, शनिवारी सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी हिंगोली जिल्ह्याला ३.३ रिश्टर स्केलचा मोठा धक्का बसला. भूकंप घडताना जमिनीतून जोरदार आवाज आवाज झाला आणि परिसर हादरून गेला. भयाच्या सावटाखाली आलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. जुलैनंतर दोन महिने शांत असलेल्या वसमत आणि परिसरात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अवघ्या दोन दिवसांत दोन धक्के बसल्याने नागरिकांमधील चिंता वाढली आहे.



