क्राईम

नांदेडमध्ये मटका अड्डे जोमात सुरू..!

स्थानिक गुन्हा शाखेच्या नांदेड ग्रामीण, इतवारा आणि शिवाजीनगर ठाणे हद्दीत धाडी, विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकानेही टाकली होती शिवाजीनगर, वजिराबाद ठाणे हद्दीत धाड 

नांदेड – नांदेड शहरात मटका अड्डे जोरात सुरू असल्याची बाब पोलिसांनी सुरू केलेल्या धाड सत्रावरूनच स्पष्ट होत आहे. स्थानिक गुन्हा शाखेने ३० एप्रिल रोजी एकाच दिवशी नांदेड ग्रामीण, इतवारा आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मटका अड्ड्यावर धाड टाकून तब्बल १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकानेही नवा मोंढा भागात मटका अड्ड्यावर छापा मारून आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे इतके दिवस हे मटका अड्डे कुणाच्या आशीर्वादाने सुरू होते याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी आता पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन क्रॅकडाऊन हाती घेतले आहे. त्या अंतर्गत मटका, जुगार, अंमली पदार्थ तसेच अवैध शस्त्र, गावठी पिस्तूल यांच्या विरोधात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या तीन पथकाने गुरुवारी तीन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी चंद्रासिंग कॉर्नर येथे साई फुटवेअरच्या बाजूला असलेल्या पानटपरी समोर काही लोक मटका खेळत असताना कारवाई केली. या कारवाईत चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रकमेसह २४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या मटका अड्ड्याचा मूळ सूत्रधार शेख मुजाहिद शेख अहमद मिया रा. सिद्धनाथ पुरी चौफाळा हा असल्याचे तपासात पुढे आले. त्याच्यासह सहा जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे यांच्या पथकाने केळी मार्केट जाणाऱ्या रस्त्यावर प्रार्थमिक आरोग्य केंद्राच्या बाजूस रस्त्यावर मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकला. तेथे दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रकमेसह २८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचवेळी घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या इतर तिघाविरुद्ध आणि मूळ सूत्रधार शेख अफसर याच्याविरुद्ध आणि अन्य पाच जणांविरुद्ध इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्या पथकाने शिवाजीनगर भागातील आबादी येथे दातार चौक इलाही हॉटेलच्या पाठीमागे काही लोक मटका खेळत असताना त्यांना पकडले. या ठिकाणी एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख रकमेसह २ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पळून गेलेल्या पाच जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हा शाखेच्या या तीन कारवाईत रमाकांत विठ्ठल जमदाडे रा. शिराढोण ता. कंधार, राहुल भीमराव चौदांते, रा. सिद्धार्थनगर बळीरामपूर, मोहम्मद अस्लम मोहम्मद अहमद मिया रा. सिद्धनाथपुरी चौफाळा, मोहम्मद नजब अली मोहम्मद याकुब अली रा. चुनाभट्टी देगलूर नाका, गौतम अशोक हातवळणे रा. शांतीनगर इतवारा, शेख मुजाहिद रा. सिद्धनाथपुरी, चौफाळा, दिलीप अमरचंद चौधरी रा. होळी नावघाट, संतोष सुभाष कडपे रा. लातूर फाटा नांदेड, कन्हैया यादव, रवी शिंदे, मोहम्मद अलकेसरी, शेख सफदर, सय्यद अन्वर सय्यद उमर रा. भाजी मंडई नई आबादी, राजू रा.गोकुळ नगर, अमेर खान सादिक खान रा .राजनगर, दत्ता रा. साठे चौक, शेख युनूस शेख युसूफ रा. नई आबादी आणि अब्दुल अब्बास गफूर रा.नई आबादी शिवाजीनगर या १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ५५ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष म्हणजे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकातील उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड व गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी ३० एप्रिल रोजी नवीन मोंढा भागात जय गुरुदेव वाईन शॉपजवळ छापा टाकला. या ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्वर चार जण आढळून आले. त्यांच्याकडे १५ हजार ७७० रुपयांची रोख रक्कम तसेच तीन मोबाईल असा एकूण ३१ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल आढळला. या मटका अड्ड्याचे मालक अब्बास रा. नई आबादी शिवाजीनगर, शेख जमीर रा. इतवारा, मटका बुकी चालवणारे संजय गायकवाड रा. भारत गॅस गोडाऊनजवळ नवीन मोंढा आणि ईश्वर जाधव रा. खोब्रागडे नगर नवीन मोंढा हे असल्याचे स्पष्ट झाले आहे या मटका अड्डा चालवणाऱ्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मटका किंग कमल यादव विरोधातही गुन्हा दाखल..पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने २८ एप्रिल रोजी कलामंदिर भागात बस स्थानकाच्या बाजूस एका शेडमध्ये छापा टाकला. या ठिकाणी मटका खेळताना नऊ जण आढळले. त्यांच्याकडे रोख ३७ हजार ६०० रुपये तर २६ हजार ५०० रुपयांचे मोबाईल, २८ हजार रुपयांचे संगणक असा एकूण ९२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मटका अड्डा नांदेडचा मटका किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमल यादव रा. दिलीपसिंह कॉलनी याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी अन्वर शेख रा. समीराबाग खडकपुरा, माधव भुसेवार रा. शिवशक्तीनगर मिल रोड आणि राजेश शर्मा रा कला मंदिर हेही त्याचे भागीदार असल्याचे स्पष्ट झाले. या चौघांसह एकूण आठ जणांविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!