क्राईम

अबब… वाजेगाव ग्रामपंचायतमध्ये तब्बल पावणे तीन कोटींचा अपहार..!

सरपंच, दोन ग्रामसेवक तसेच इतराविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा, नांदेड जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या आदेशानंतरही झाला नव्हता अद्याप गुन्हा दाखल, विस्तार अधिकाऱ्यांच्या चौकशीत २ कोटी ८४ लाखांचा अपहार झाला होता स्पष्ट 

नांदेड – मृत व्यक्तींच्या नावे अनुदान लाटणे, दलित वस्ती निधीतून बोगस कामे दाखवून निधी लाटणे, काम न करता निधी उचलणे यासह अन्य मार्गाने नांदेड शहरालगत असलेल्या वाजेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, दोन ग्रामसेवक आणि इतरांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१९ पासून हे प्रकरण ऑन पेपर आले असतानाही नांदेड जिल्हा परिषदेने मात्र याकडे चक्क कानाडोळा केला असल्याचा प्रकारही पुढे आला आहे. सरपंच शेख जमील यांना पोलिसांनी अटक केली असे आता त्या दोन ग्रामसेवकांचाही शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड तालुक्यातील वाजेगाव येथील येथे सरपंच पदावर २०१० पासून शेख जमील अहमद अमीर हमजा हे आहेत वाजेगाव येथील शेख हुसेनाबी शेख मस्तान या ११ एप्रिल २०१६ रोजी मरण पावल्या. त्याबाबत ग्रामपंचायत वाजेगाव कार्यालयात मृत्यूची नोंद असतानाही सरपंच शेख जमील यांनी मृत शेख हुसेनाबी यांच्या नावे ६ ऑगस्ट २०१६ रोजी तत्कालीन ग्रामसेवक एस. एस. देशमुख यांच्या मदतीने बँकेतून १२ हजार रुपये उचलून घेतले. त्यातून शासकीय निधीचा अपहार केला. त्याचवेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सार्वजनिक खात्यावरून डीसीसी डीसीबी बँकेतून २८ ऑगस्ट २०१५ रोजी दोन धनादेशाद्वारे सरपंच जमील अहमद याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या खात्यावरून १ लाख ४४ हजार रुपये स्वतःच्या नावे उचलले. त्यांना तत्कालीन ग्रामसेवक एस. एस. देशमुख यांनी मदत केली. त्यापुढेही सरपंच जमील अहमद यांनी वाजेगाव ग्रामपंचायतच्या खात्यातून १ लाख ५६ हजार रुपयांचा शासकीय निधी स्वतःच्या नावे घेणे बेकायदेशीर असतानाही तो निधी स्वतःच्या नावे घेतला. यासाठी त्यांना ग्रामसेवक एस. एस. देशमुख यांनी मदत केली. शेख हनीफ शेख नवाज हे रोज मजुरी करतात त्यांच्या नावाने ८ सप्टेंबर २०१६ रोजी १४ लाख २० हजार ७०० रुपयांचा धनादेश वटला. ही रक्कम दलित वस्ती सुधारणा करिता वापरले असे दाखवले; परंतु त्याची कोणत्याही रजिस्टरला नोंद केली नाही. यासाठी ग्रामसेवक एस. एस. देशमुख हे सरपंच जमील अहमद यांच्या मदतीसाठी होते.

वाजेगावचे तत्कालीन उपसरपंच शेख महमूद शेख हसन यांनी सरपंच जमील अहमद हे ग्रामसेवकांना हाताशी धरून ग्रामपंचायत निधीचा गैरवापर करीत आहेत असे लक्षात आल्यावर त्यांनी सरपंच जमील अहमद आणि तत्कालीन ग्रामसेवक एस. एस. बोथीकर यांना विरोध केला. त्यावेळी सरपंच जमील अहमद आणि तत्कालीन ग्रामसेवक एस. एस. बोथीकर यांनी तू आमच्या विरोधात जातोस का असे म्हणून उपसरपंच शेख महबूब यांना फसविण्याच्या उद्देशाने १ फेब्रुवारी २०१९ रोजी धनादेश आधारे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर टाकले आणि शासकीय निधीचा दुरुपयोग केला.

वाजेगावचे सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक एस. एस. बोथीकर, एस. एस. देशमुख यांना हाताशी धरून हा तब्बल २ कोटी ८४ लाख रुपयांचा शासकीय निधी हडप केला आहे. सरपंच जमील अहमद हमजा हे ९ ऑगस्ट २०१० पासून वाजेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर आहेत. तेव्हापासून आजपर्यंत त्या त्या वेळी असलेल्या ग्रामसेवकांना हाताशी धरून ग्रामपंचायतसाठी आलेल्या निधीचा गैरवापर आणि अपहर करून शासनाची फसवणूक केली. सदरचा अपराध हा २०१० पासून सुरू असताना सदर प्रकरणी संबंधित वरिष्ठ कार्यालयात तक्रारी झाल्या. सदर प्रकरणी सरपंच शेख जमील अहमद अमीर हमजा, एस. एस. बोथीकर, एस. एस. देशमुख आणि इतर दोषी असतानाही त्यांना प्रशासनातील वरिष्ठ लोकांनी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठीशी घालून फौजदारी स्वरूपाचा कट रचला. यात ग्रामसेवक एस. एस. बोथीकर व एस. एस. देशमुख हे लोकसेवक असतानाही शासनाची फसवणूक होईल या उद्देशाने शासकीय निधीचा अपहार करून फौजदारी पात्र न्यास भंग केला आहे. त्यांनी ग्रामपंचायत वाजेगावसाठी आलेल्या शासकीय निधीचा अपहर करून शासनाची फसवणूक करण्यासाठी शेख जमील अहमद अमीर हमजा व इतर लोकांनी मदत करून पाठीशी घातले आहे. या सर्व प्रकरणात वाजेगाव येथील पत्रकार लतीफ खान पीर खन पठाण यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी सरपंच शेख जमील अहमद अमीर हमजा ग्रामसेवक एस एस बोथीकर ग्रामसेवक एस एस देशमुख आणि इतर यांच्याविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सरपंच शेख जमील अहमद अमीर हमजा याला अटक केली आहे.

वाजेगावचे सरपंच जमील अहमद, तत्कालीन ग्रामसेवक एस.एस. बोथीकर, एस. एस. देशमुख यांनी केलेल्या अपहारासंबंधीची चौकशी तत्कालीन विस्तार अधिकारी डी. एस. बच्चेवार यांनी केली. त्यांनी १९ नोव्हेंबर २०१९ रोजी चौकशी नांदेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यात त्यांनी सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या पैशाचा अपहार केल्याचे चौकशी अहवालामध्ये स्पष्ट केले आहे. या प्रकरणात विस्तार अधिकाऱ्यांच्या पत्रावरून नांदेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही अहवाल दिला. त्यात त्यांनी वाजेगावचे सरपंच जमील अहमद तत्कालीन ग्रामसेवक यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे स्पष्ट केले आहे. नांदेड जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १९ सप्टेंबर २०१९ रोजी नांदेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र देऊन वाजेगावचे सरपंच शेख जमील अहमद हमजा आणि दोन्ही ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांनी शासनाची फसवणूक करून अपरातफर केलेले २ कोटी ८४ लाख रुपये वसूल करण्याबाबतचे पत्र दिले आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही हेही एक मोठे नवलच मानले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!