क्राईम

पतीला विजेचा शॉक देऊन जीवे मारणाऱ्या पत्नीला जन्मठेप..!

चारित्र्यावर संशय घेत असल्याने काढला काटा, उमरी येथे घडली होती खुनाची घटना, भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

नांदेड – चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला विजेचा शॉक देऊन जीवे मारणाऱ्या पत्नीला भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद नासिर मोहम्मद सलीम यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. खुनाचा हा प्रकार जून २०१९ मध्ये घडला होता. या प्रकरणात उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

उमरी पोलीस स्टेशन हद्दीत १६ जून २०१९ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार उमरी तालुक्यातील तळेगाव येथील आम्रपाली भीमराव हैबते (वय २९) हिने तिचा पती भीमराव नागोराव हैबते हा तिच्यावर वारंवार संशय घेत असल्या कारणाने भीमराव हैबते यांचा विद्युत शॉक देऊन खून केला होता. या प्रकरणात उमरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात उमरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे यांनी भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप सादर केले. या प्रकरणात भोकरचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मोहम्मद नासिर मोहम्मद सलीम यांनी सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून आम्रपाली भीमराव हैबते हिला कलम ३०२ भादंवी अंतर्गत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात सुरू असलेल्या विविध खटल्यांमध्ये विशेष लक्ष देण्यासाठी ट्रायल मॉनिटरिंग सेलची स्थापना करण्यात आली आहे. उमरी येथील प्रकरणात सरकारी अभियोक्ता अनुराधा शिवराज डावकरे( रेड्डी ) यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोना श्रीनिवास नाईनवाड यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाच्या यशस्वी तपासाबद्दल पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी उमरीचे तपास अधिकारी आणि पैरवी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!