
नांदेड : नांदेड शहरातील शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत महानगरपालिकेतर्फे अनधिकृत जाहिरात होर्डींग्सवर धडक कारवाई करत मौर चौक येथे अनधिकृत बॅनर लावणारे राजु रामराव मोतेवार, सोमेश राजु मोतेवार, क्षितीज राजु मोतेवार यांच्यासह बॅनर तयार करणारे व लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द त्याचप्रमाणे काबरानगर रिंग रोडवर अनधिकृत बॅनर लावणाऱ्या व्यक्तीविरुध्दसुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने मनपा हद्दीमध्ये जाहिरात फलक लावण्यासाठी एकुण ११८ ठिकाणे निश्चित केले आहेत. सदरील ठिकाणी जाहिरात फलकांच्या फ्रेम लावण्यात आलेल्या असून त्या फ्रेमची साईजसुध्दा निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये महानगरपालिकेने निर्धारीत केलेले शुल्क भरुन नागरीकांना, स्वंयसेवी संस्थांना तात्पुरती जाहिरात लावता येते. परंतु शहरातील खाजगी बिल्डर यांच्यासह बॅनर तयार करणारे व लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द विनापरवानगी जाहिरात फलक लावण्यात आल्याची बाब २६ मे रोजी निदर्शनास आल्याने महाराष्ट्र विरुपन प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ चे उल्लंघन केल्यामुळे संबंधिताविरुद्ध भाग्यनगर ठाण्यात महानगरपालिकेतर्फे तक्रार दिली आहे.
सदरील कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, इमारत निरीक्षक भरत शिवपुरे, अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर व त्यांच्या अतिक्रमण पथकाने पार पाडली आहे. शहरातील नागरीकांनी व व्यापारी वर्गाने महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत स्थळावर परवानगी घेऊनच होर्डींग्स लावावत त्याचप्रमाणे अनधिकृत जाहिरात फलक लावुन शहर विद्रुपीकरण न करता महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.



