
नांदेड – नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल ८० तोळे सोन्यावर कॅश इन्चार्जच्या मदतीने डल्ला मारणाऱ्या सर्विस मॅनेजर जीवन माधवराव जगदाळे याला वजीराबाद पोलिसांनी अटक केली आहे. त्याला रविवारी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता आणखी कोण कोण सहभागी आहे याचाही उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रकरणात कॅश इन्चार्ज आदित्य सेनगावकर याचा शोध सुरू असल्याचे वजीराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी सांगितले.
स्टेट बँक ऑफ इंडियाची नांदेडमध्ये डॉक्टर लेन भागात शाखा आहे. या शाखेत जवळपास १४९ ग्राहकांनी कर्ज घेण्यासाठी सोने तारण म्हणून ठेवले आहे. अपहाराच्या या प्रकरणानंतर बँक अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर आठ ग्राहकांचे लॉकरमध्ये ठेवलेले ८०५.९० ग्राम सोने बँकेत नसल्याची माहिती पुढे आली. हे सर्व सोने बँकेचा कॅश इन्चार्ज असलेल्या आदित्य प्रकाश सेनगावकर आणि सर्विस मॅनेजर जीवन माधवराव जगदाळे यांनी संगनमत करून लंपास केले होते. आपला हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून या दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये ४१४ ग्रॅम बनावट सोने ठेवले. लंपास केलेल्या या सोन्याची किंमत ८५ लाख ८१ हजार ५९७ रुपये दर्शविण्यात आली आहे. १८ मे पूर्वी हा प्रकार घडला आहे.



