
नांदेड – नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस पक्षाने निरीक्षक म्हणून नेमणूक केलेल्या तसेच नांदेडचे काँग्रेस खासदार असलेले प्रा. रवींद्र चव्हाण हे सध्या भारतातील एका थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चव्हाण यांच्या भाजप जवळीकतेवर चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत आजघडीला सर्वाधिक मतदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळे या पक्षाचा उमेदवार राहावा अशी इच्छा ‘सर्वांकडूनच ‘ व्यक्त होत असतानाच काँग्रेसचे खासदार मात्र या सर्व घडामोडीपासून अलिप्त आहेत. त्यांच्या या दौऱ्याची आता पक्षातच वेगवेगळ्या अँगलने चर्चा सुरू झाली आहे.
नांदेडमध्ये काल काँग्रेसच्या वतीने नूतन जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांकडून इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे करणार असल्याचे सोशल मीडियावरून कळविण्यात आले होते; मात्र या आंदोलनात खासदार प्रा. रवींद्र चव्हाण हे अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. अधिक माहिती घेतली असता ते भारतातील एका थंड हवेच्या ठिकाणी असल्याची बाबही पुढे आली आहे.
नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत थेट राज्याबाहेर जाऊन सुट्ट्यांचा आनंद खासदारांकडून घेतला जात आहे दुसरीकडे काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर नांदेडच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे खासदार आणि त्यात निरीक्षक अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर असतानाही ते नांदेडमध्ये अनुपस्थित असणे हे एक वेगळे संकेत दर्शवीत आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी नांदेड मतदार संघात सर्वाधिक मतदार असलेल्या भाजपाकडून ही निवडणूक बिनविरोध होईल, असाच दावा केला जात आहे. या दाव्याला काँग्रेस खासदाराच्या अनुपस्थितीमुळे पुष्टीच मिळत आहे.
निवडणूक बिनविरोध होऊ नये अशी तीव्र इच्छा मतदारांमध्ये असली तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस खासदारांच्या भूमिकेमुळे त्यांच्या इच्छेवरही पाणी फिरते की अशीच चर्चा रंगली आहे. त्यात आतापर्यंत खासदार पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर आणि आमदार पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत ३५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. सोमवार हा एकच दिवस उमेदवारी दाखल करण्यासाठी उरला आहे. महायुतीकडून माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांच्यासह चैतन्यबापू देशमुख, संजय कौडगे, किशोर स्वामी यांची नावे उमेदवारीसाठी पुढे येत आहेत. महाविकास आघाडीकडून कोणत्याच नावाची साधी चर्चाही झाली नाही. त्यात राजेश पावडे यांना उमेदवारीसाठी तयार केले जात आहे. रामदास पाटील हेही मतदारांच्या संपर्कात आले आहेत. माजी आमदार माधवराव जवळगावकर यांनीही अर्ज घेतला आहे.
महायुतीच्या शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून मध्यरात्री चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. वरिष्ठ नेते एकमेकांच्या भेटी घेत आहेत. त्याचवेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडून ही निवडणूक बिनविरोध होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात असताना काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि जिल्ह्याचे खासदार असलेल्या प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांची ही उन्हाळी सुट्टी नेमकी काय दर्शवित आहे? असा प्रश्न काँग्रेसमधूनच उपस्थित केला जात आहे. नुकतीच खासदार चव्हाण यांची काँग्रेसच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. या निवडीबाबतही काँग्रेसमधूनच नाराजी व्यक्त केली जात आहे. इतकेच नव्हे तर थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडेही याबाबत तक्रार करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष पदाची संधी एखाद्या कार्यकर्त्यालाही देता आली असती मात्र तसे न करता त्यांनी आपल्याकडेच हे पद ठेवले आहे. पद ठेवले असले तरीही पक्ष वाढीसाठी नेमके काय केले जात आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहे. काँग्रेस पक्षाची आढावा बैठकही गेल्या अनेक महिन्यापासून झाली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाची वाढ कशी होईल, आगामी निवडणुकांमध्ये पक्ष चांगली कामगिरी कसा करेल असा प्रश्नही उपस्थित होत आहे.



