
नांदेड – नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेअंतर्गत उमेदवारी अर्ज भरण्याची ३० जून ही शेवटची तारीख आहे. २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या या निवडणुकीत आतापर्यंत तीन विद्यमान आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, विद्यमान नगरसेवक यांच्या ८० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या मंगळवारी अंतिम दिवशी या अर्जांची संख्या २०० हून अधिक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या अनेक वर्षात तोट्यात होती. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या उपाययोजनानंतर नांदेड जिल्हा बँक जवळपास साडे चार.. पाच कोटींच्या नफ्यात आली आहे. त्यामुळे आता बँकेच्या संचालक मंडळात आपली वर्णी लागावी यासाठी जिल्ह्यातील सर्वच राजकारणी इच्छुक असल्याचे दिसत आहे. अर्ज भरण्याच्या मुदतीत आतापर्यंत तीन विद्यमान आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, विद्यमान नगरसेवक यांच्यासह ८० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ३० जून ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
या निवडणुकीत प्रार्थमिक कृषी पतपुरवठा व वि.का. सेवा सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रत्येकी १ प्रतिनिधी निवडला जाणार आहे. नागरी सहकारी बँका, नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था, प्रक्रिया व पणन सहकारी संस्था इत्यादी मतदारसंघातून एक प्रतिनिधी, वरीलप्रमाणे अ आणि ब मतदार संघात समावेश नसलेल्या इतर सर्व सहकारी संस्था व व्यक्ती सभासद म्हणून एक प्रतिनिधी, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणन एक, महिला प्रतिनिधी दोन, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी एक आणि भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून एका संचालकाची निवड केली जाणार आहे. अशा एकूण २३ संचालक पदासाठी १२०० हून अधिक सभासदांमधून ही निवडणूक होत आहे.
३० जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. या अर्जांची १ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून छाननी केली जाईल. त्यानंतर २ जुलै रोजी वैध उमेदवारांची यादी घोषित केली जाईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी २ जुलै ते १६ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १७ जुलै रोजी रिंगणातील उमेदवारांची यादी तसेच उमेदवारांना मिळालेल्या निशाणीचे वाटप करण्यात येणार आहे. २६ जुलै रोजी मतदान होणार आहे. २८ जुलै रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल घोषित करण्यात येईल.
२९ जूनपर्यंत आलेल्या अर्जामध्ये तीन विद्यमान आमदारांच्या अर्जांचा समावेश आहे. त्यात मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, किनवटचे आमदार भीमराव केराम, हदगावचे आमदार बाबुराव कदम यांचा समावेश आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक दिलीप कंदकुर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, मीनल पाटील, प्रणिता देवरे-चिखलीकर, मारोतराव कवळे यांच्यासह संगीता विठ्ठल पाटील, राजेश देशमुख, अनिल पाटील, शिवकुमार भोसीकर, श्रावण भिलवंडे आदींचा समावेश आहे. उद्या मंगळवारी उमेदवारांच्या या यादीमध्ये आणखी काही बड्या दिगजांचा समावेश होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
