
नांदेड – नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी शहरप्रमुखाविरुद्ध विनापरवानगी बॅनर लावल्या प्रकरणी नांदेड महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या एका खंद्या समर्थकाला शुभेच्छा देणारे हे बॅनर लावणाऱ्या शिवसेना ओबीसी शहर प्रमुख गणेशअप्पा हलकोडेविरूद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेने विनापरवानगी बॅनर लावणाऱ्या विरुद्ध आतापर्यंत ११ गुन्हे दाखल केले आहेत. शहरात कोणत्याही स्वरूपात विनापरवानगी बॅनर लावणे खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या माध्यमातून दिला आहे.
रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास क्षेत्रिय कार्यालय क्रमांक दोनच्या हद्दीमध्ये हनुमान गड कमानीच्या बाजूस मुख्य रस्त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी शहर प्रमुखाने नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या एका कट्टर समर्थकाच्या वाढदिवसानिमित्त हे राजकीय बॅनर लावले होते. या बॅनरची महापालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. ही बाब उघड होताच महापालिकेच्या इमारत निरीक्षक सचिन गजभारे यांनी या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून गणेशअप्पा हलकोडे तसेच हे बॅनर तयार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मठवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
महापालिकेने आतापर्यंत अकरा गुन्हे दाखल करून विनापरवानगी बॅनर लावणाऱ्यांना चांगलाच इंगा दाखवला आहे. यामध्ये राजकीय मंडळीसह व्यावसायिक तसेच बॅनर तयार करणाऱ्यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बॅनर लावले जातील अशी अपेक्षा होती; मात्र त्यावर महापालिकेने नियंत्रण ठेवत कोणतेही अनधिकृत बॅनर लागणार नाही याची दक्षता घेतली होती. त्यामुळे आगामी काळातही आता विनापरवानगी बॅनर लागणार नाहीत याची खबरदारी महापालिका प्रशासनाकडून निश्चितपणे घेतली जाईल, असा विश्वास शहरवासीयांकडून व्यक्त केला जात आहे.



