
नांदेड – नांदेड नगरपालिकेचे माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक तथा दिवंगत केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी नरसिंग मोहनराव पावडे (वय ७८) यांचे सोमवारी (दि. २९ जून) दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नरसिंगराव पावडे यांनी बी.एस्सी. (ॲग्री) ही पदवी संपादन केली होती. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी १९८५ ते १९९२ या कालावधीत नांदेड नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून कार्य करत लोकसेवा बजावली. कृषी, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. ते सत्य साईबाबा समितीचे प्रचारक होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते ॲड. निलेश पावडे यांचे वडील तसेच माजी महापौर जयश्री निलेश पावडे यांचे सासरे होत. त्यांच्या पार्थिवावर ३० जून रोजी सकाळी ११ वाजता गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी मुख्यमंत्री, खा. चव्हाण यांनी केले दुःख व्यक्त…माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे सहकारी, नांदेडचे माजी नगरसेवक नरसिंगरावजी पावडे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. पावडे कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. नरसिंगरावजी पावडे यांना श्रद्धांजली व पावडे परिवाराला हा आघात सहन करण्याचे बळ मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. अशा शब्दात खा. चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



