आरोग्य

छत्रपती संभाजीनगरहून नांदेडपर्यंत किडनीचे यशस्वी ग्रीन कॉरिडोर

सात वर्षापासून उपचार घेत असलेल्या देगलूरच्या रुग्णाला मिळाले जीवनदान, नांदेडमधील श्री गंगा हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण

नांदेड – छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णाचे अपघाती निधन झाल्यानंतर कुटुंबियांनी घेतलेल्या अवयव दानाच्या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एका ४३ वर्षीय रुग्णाला जीवनदान मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगरहून नांदेडपर्यंत ग्रीन कॉरिडोरद्वारे आणलेल्या किडनीचे नांदेडमधील श्री गंगा हॉस्पिटलमध्ये मंगळवारी यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील गजानन अचिंतलवार वय ४३ वर्षे या रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. जवळपास सात वर्षापासून या रुग्णाचे डायलिसिस सुरू होते. या रुग्णाकडून किडनीसाठी शोध सुरू होता. त्याचवेळी किडनीसाठी या रुग्णाकडून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथे एका अपघातात ब्रेनडेड झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी नियमानुसार अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. ऑनलाइन रजिस्ट्रेशनद्वारे पाहिले असता देगलूरच्या रुग्णाची नोंदणी सर्वात वर होती. त्यामुळे या रुग्णाला छत्रपती संभाजीनगर येथील त्या ब्रेनडेड रुग्णाची किडनी देण्याचा निर्णय झाला. याबाबत नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटलला छत्रपती संभाजीनगरहून माहिती देण्यात आली होती. त्यानुसार श्री गंगा हॉस्पिटलने देगलूरच्या रुग्णाला याबाबत माहिती दिली. सोमवारी त्याला रुग्णालयात भरती करून घेण्यात आले. आवश्यक त्या सर्व चाचण्या करून प्रत्यारोपणाची तयारी डॉक्टरांनी पूर्ण केली होती.

रुग्ण गजानन अचिंतलवार यांचा रक्तगट पुण्याला पाठविण्यात आला तर छत्रपती संभाजीनगर येथील दाता रुग्णाचा रक्तगटही पुण्याला पाठविण्यात आला. दोघांचेही रक्तगट जुळल्याने प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा झाला. ब्रेनडेड रुग्णाच्या कुटुंबीयांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देगलूरच्या रुग्णाला दुसरे जीवन मिळाले आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विशेष रुग्णवाहिकेद्वारे ग्रीनकॉरिडोरद्वारे दोन किडनी छत्रपती संभाजीनगरहून नांदेडला आणण्यात आल्या. या दरम्यान शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटीतीर्थवाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

नांदेडला किडनी दाखल झाल्यानंतर तब्बल ४ तासांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सध्या रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती हॉस्पिटलचे डॉ. शहाजी जाधव, डॉ. पवार, डॉ. राठोड, डॉ. कागणे यांनी दिली. तसेच ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या रुग्णांचे अवयव दान करावे, ज्याद्वारे एका रुग्णाच्या अवयवामुळे कमीत कमी आठ जणांना नवजीवन मिळू शकते. यासाठी समाजामधील जागृत नागरिकांनी अवयव दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या शस्त्रक्रियेबाबत डॉ. शहाजी जाधव म्हणाले, “श्री गंगा हॉस्पिटलमध्ये ही दुसरी यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. अवयवदानामुळे एका रुग्णाला नवजीवन मिळाले. संपूर्ण टीमच्या समन्वयामुळेच हे शक्य झाले.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!