आरोग्य

उमरी तालुक्यात २०० हून अधिक भाविकांना विषबाधा..!

भंडाऱ्याच्या जेवणानंतर अनेकांना मळमळ, उलट्या, सात जणांना खबरदारीचा उपाय म्हणून नांदेडला हलविले..!

नांदेड – उमरी तालुक्यातील कावलगुडा बु. येथे भवानी माता मंदिरावर आंबील व भंडाऱ्याच्या कार्यक्रमात आंबीलमधून २०० जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या सर्व रुग्णांना उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ७  रुग्णांना नांदेडला हलविण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थानी दिली. उपजिल्हा रुग्णालयात जागा कमी पडत असल्याने आता रुग्णांवर एका मंगल कार्यालयात हलवून तिथे उपचार करावे लागणार आहेत.

उमरी तालुक्यातील कावलगुडा बु. येथे ७ एप्रिल रोजी आंबील व भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात होता. दुपारी बारा वाजेपासूनच मंदिरासमोर भंडाऱ्याला सुरुवात झाली. काही वेळातच अनेक भाविकांना पोटदुखी, जुलाब, उलटी होऊ लागली. काही जणांनी जवळच्या खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. औषधी, गोळ्या घेऊन हे सर्व रुग्ण परत घरी गेले. सायंकाळी रुग्णांची संख्या वाढतच गेली. अनेकांना त्रास जाणवू लागला. मंगळवारी सायंकाळी सात वाजता पासून उमरी ग्रामीण रुग्णालयात महिला, पुरुष, लहान बालके मोठ्या संख्येने उपचारासाठी दाखल झाले.

विषबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने परिस्थिती गंभीर झाली. या सर्व प्रकाराची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रांती शिलेदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन देवराये, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.एम. चंदापूरे , डॉ. अर्जुन शिंदे, डॉ. मुनेश्वर यासह शहरातील अनेक खासगी डॉक्टर, परिचारिका हे सर्व ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.

घटनेची माहिती मिळताच अमरी बाजार समितीचे सभापती शिरीष देशमुख गोरठेकर, उपनगराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर आदींसह अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. रुग्णांची संख्या वाढल्याने आंतररुग्ण विभागात बेड कमी पडले. म्हणून अनेक रुग्णांवर व्हरांड्यात तसेच मिळेल त्या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले. अनेक रुग्णांना कारेगाव , धर्माबाद, सिंधी आदी ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. चार रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकितक डॉ. संजय पेरके यांनी उमरीकडे धाव घेतली आहे. त्यांनी सिंधी येथील काही रुग्णांची पाहणी करून ते उमरीला पोहोचले. कावलगुडा बु. गावातील मंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमात आंबील करण्यात आली होते. या आंबिलासाठी वापरण्यात आलेल्या दहीच्या माध्यमातून ही विषबाधा झाल्याचा प्रार्थमिक अंदाज आहे. बाधित रुग्णांमध्ये काही गरोदर माता आणि लहान मुलांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. अशा रुग्णांची संख्या जवळपास सात असल्याचे डॉ. पेरके यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी हे रुग्ण धोक्याबाहेर असल्याचेही त्यांनी सांगितले . खबरदारीचा उपाय म्हणून वेळीच या रुग्णांना नांदेडला हलविण्यात येत असल्याचेही डॉ. पेरके म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!