
नांदेड – नांदेड महापालिकेच्या अग्निशमन अधिकारी पदावर उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांच्या संदर्भाने अनुसूचित जमाती कल्याण समितीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दासरे यांच्याकडील पदभार तत्परतेने काढून घेतला आहे. आता हा पदभार आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे यांच्याकडे सोपविला आहे.
नांदेड महापालिकेचे अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांची १९ डिसेंबर १९८९ रोजी अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवर फायरमन म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर २६ जून २००६ रोजी अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवरून त्यांना लीडिंग फायरमन पदावर पदोन्नती देण्यात आली. मात्र, जात प्रमाणपत्राच्या वैधतेचा प्रश्न कायम राहिल्याने पुढे हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत गेले. उच्च न्यायालयाच्या ९ मार्च २०१७ रोजीच्या आदेशानुसार अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दीड वर्षाची मुदत देण्यात आली होती. ही मुदत सप्टेंबर २०१९ मध्ये संपुष्टात आली; मात्र संबंधित कर्मचाऱ्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार केलेली कार्यवाही किंवा कागदपत्रे महानगरपालिका प्रशासनास सादर केली नसल्याचा आरोप गायकवाड यांनी तक्रारीद्वारे केला. असे असतानाही दासरे यांना पदोन्नतीसह अग्निशमन अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार दासरेकडे सोपविण्यात आल्याची तक्रार गायकवाड यांनी नांदेडमध्ये दाखल झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीकडे केली.
दासरे यांच्या सेवाविषयक इतिहासाबाबतही गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. सेवाकाळात दोन वेळा निलंबन झाल्याचे तसेच २३ एप्रिल २०१४ रोजी सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ९ डिसेंबर २०१५ रोजी काही कठोर शिक्षांसह सेवेत पुनर्स्थापना करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या शिक्षांचे आदेश अद्याप कायम असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. अग्निशमन विभागाशी संबंधित ना-हरकत प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत सामान्य नागरिक तसेच डॉक्टरांची अडवणूक करून मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी केल्याच्या तक्रारी असल्याचा गंभीर उल्लेखही गायकवाड यांच्या पत्रात करण्यात आला आहे. या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या मनपा स्थायी सभेत संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदविल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणात आता आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी कठोर भूमिका घेत दासरे यांच्याकडील अग्निशमन विभागाचा पदभार काढून घेतला आहे. हा पदभार उपअग्निशमन अधिकारी असलेले निलेश कांबळे यांच्याकडे सोपवला आहे. दासरे यांच्याकडील पदभार काढण्यामागे त्यांच्यासंदर्भाने होत असलेल्या वाढत्या तक्रारी हेही एक महत्वाचे कारण ठरले आहे. एकीकडे महापालिकेत वरिष्ठ पदांवर अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यांना संधी मिळत नसल्याची तक्रार महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीकडे करण्यात आलेली असताना आणखी एका कर्मचाऱ्याचा पदभार अनुसूचित जमाती कल्याण समिती नांदेडमध्ये असतानाच काढून घेण्यात आला हे विशेष..!



