
नांदेड – नांदेडमध्ये मातंग समाजाचा मोर्चा आणि त्याच दिवशी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना हा केवळ योगायोग नाही. १३ सप्टेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणात मातंग समाजाच्या मोर्चात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केलेल्या वक्तव्याचा संबंध दिसत आहे. त्यामुळे लक्ष्मण ढोबळेविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई सुरेश गायकवाड आणि इतर महिला यांनी पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची भेट घेऊन केली आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग यांच्यासह मुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे.
नांदेडमध्ये निघालेल्या मातंग समाजाच्या मोर्चात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे याने अनुसूचित जातीतील महार, बौद्ध समाजातील महिला आणि मुलीविरुद्ध लैंगिक अत्याचार करण्यास प्रवृत्त करणारे जातीय व लैंगिक स्वरूपाचे अपमानास्पद वक्तव्य केले आहे. सदर वक्तव्याला सार्वजनिक मंचावर उपस्थित असलेल्या व्यक्तींनी समर्थन तसेच प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच दिवशी नांदेडमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रकार घडला आहे. या गुन्ह्याशी ढोबळे यांच्या संभाव्य वक्तव्याचा असलेला संबंध याची चौकशी करावी तसेच कायद्यानुसार ढोबळेविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई गायकवाड यांनी केली आहे.
मातंग समाजाच्या मोर्चात एका विशिष्ट समुदायातील महिला आणि मुलीविरुद्ध लैंगिक स्वरूपाचे कृत्य करण्यास प्रवृत्त करणारे वक्तव्य झाले. त्याच दिवशी त्याच शहरात एका अल्पवयीन मुलीवर गंभीर लैंगिक अपराध घडावा हा निव्वळ योगायोग नव्हे, ढोबळेच्या वक्तव्यानंतर नांदेडमध्ये हा अत्याचाराचा प्रकार घडला आहे. सदर वक्तव्य करत असताना मंचावर असलेल्या प्रा. सुकुमार कांबळे, सचिन साठे, अजिंक्य चांदणे यांनी तसेच उपस्थित व्यक्तींनी टाळ्या शिट्ट्या व इतर प्रतिसादाद्वारे त्या वक्तव्याला सार्वजनिक प्रोत्साहन मिळेल अशी प्रतिक्रिया दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या व्यक्तींची केवळ उपस्थिती न तपासता त्यांची वक्तव्य, प्रतिक्रिया, परस्पर संवाद, वक्तव्याला दिलेले समर्थन, कार्यक्रमातील त्यांची भूमिका आणि सदर वक्तव्याच्या संदर्भातील त्यांचे ज्ञान व हेतू यांचा स्वतंत्र तपास करावा अशी मागणीही अंजलीताई गायकवाड यांनी केली आहे. सचिन साठे हे या कार्यक्रमात महारांना असा उल्लेख करीत महार समाजाला उद्देशून जातीय स्वरूपाची भाषा वापरत असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारचे वक्तव्य सार्वजनिक मंचावर पुन्हा होऊ नये आणि त्यातून कोणत्याही समुदायातील महिला किंवा मुलीविरुद्ध हिंसा, लैंगिक अपराधाची प्रेरणा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने कायद्यानुसार आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे ढोबळे यांच्या आगामी सभा, मोर्चे, सार्वजनिक कार्यक्रमाबाबत वास्तविक कायदा सुव्यवस्था धोका तपासून सक्षम तसेच पोलीस प्राधिकरणाने प्रतिबंधात्मक अधिकारांचा कायदेशीर वापर करावा अशी मागणी ही करण्यात आली आहे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि नांदेडमधील अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी यांच्यातमध्ये कोणत्याही माध्यमातून काही संपर्क झाला आहे का याची कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करावी, संबंधित व्यक्तीच्या आगामी सार्वजनिक कार्यक्रमासाठी परिस्थितीनुसार कायदेशीर अटी, पोलीस बंदोबस्त किंवा इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. या प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्षपणे करण्यात यावा अशी, मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणात शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना निवेदन देण्यात आले आहे.



