
नांदेड – नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदेड महापालिकेच्या महापौर कविता मुळे यांनी शहरांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम हाती घेऊन नांदेड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा संकल्प केला. खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ झाला. दुसरीकडे मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नांदेड महापालिकेच्या कचऱ्याला चक्क पाय फुटल्याची बाब नांदेड ग्रामीण पोलिसांनी उघड केली आहे. महापालिकेच्या तुप्पा डम्पिंग ग्राउंडवरून धोकादायकरित्या थेट हायवाद्वारे कचरा शहराबाहेर नेला जात असल्याने सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये डेपोवाल्यासह संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्षाचाही समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासात आता नांदेड ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात बडे बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या वतीने नांदेड शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम महिनाभर चालणार असल्याचे महापौर कविता मुळे यांनी स्पष्ट केले. शहरवासीयांनी या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. दुसरीकडे नांदेड ग्रामीण पोलिसांनी मात्र कचऱ्याचा मोठा पर्दाफाश केला आहे. नांदेड शहरातील कचरा उचलून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. कचऱ्यावर प्रोसेसिंग करण्यासाठी महापालिका कोट्यावधी रुपये ठेकेदाराला अदा करत असते; मात्र या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता वजन केलेला कचरा उचलून तो थेट शहराबाहेर नेला जात आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली असल्याचे स्पष्ट होत आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने १६ सप्टेंबरच्या रात्री सिडकोकडून काही हायवा ट्रक अत्यंत दुर्गंधीयुक्त कचरा वाहनांच्या काठोकाठ भरून कोणतीही ताडपत्री न झाकता नेत असल्याचे निदर्शनास आले. सदर कचऱ्यातील पॉलिथिन, कपड्याचे तुकडे, माती चिखल रस्त्यावर सांडत होते. या कचऱ्यामुळे अपघात झाल्याची बाबही निदर्शनास आली. यातून नागरिकांच्या आरोग्यास आणि जीवितास गंभीर धोका झाला होता. ही बाब लक्षात येताच नांदेड ग्रामीण ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरटीओ कार्यालयासमोर थांबून चालक आणि मालकाविषयी चौकशी केली असता हायवा क्रमांक एमएच २६ डीबी ७७१७ चा चालक प्रज्वल सदाशिव धुतमल रा. धानोरा, वाहन मालक गजानन किसनराव हंबर्डे रा. विष्णुपुरी, हायवा क्रमांक एमएच ०१ सीव्ही २३९७ चा चालक शिवलिंग संभाजी संगेकर रा. लालवाडी, वाहन मालक पवन पांडुरंग काळे रा. जुना कौठा, हायवा क्रमांक एमएच ४० बीएल ६१०५ चा चालक नरहरी नामदेव धुतराज रा. जानापुरी, वाहन मालक सदानंद संजय पुयड रा. पुणेगाव अशी नावे सांगितले. हायवा ट्रक चालकाकडे कचरा वाहतुकीचा कोणताही परवाना आढळला नाही. चालकाकडे चौकशी केली असता सदर दुर्गंधीयुक्त कचरा महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वरून डेरला फाटा येथील खदानित विल्हेवाट लावण्यासाठी नेला जात होता.
मानवी जीवितास आणि आरोग्यास धोका निर्माण होईल अशा प्रकारे उघड्यावर दुर्गंधीयुक्त कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या तीन हायवा चालक आणि मालकाविरुद्ध तसेच कचरा डेपोवाल्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक आनंद चव्हाण व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार राजू जंकूट, गुरुनाथ कारामुंगे, जमीर, जाधव आणि हनुमंता कदम यांनी केली आहे. सार्वजनिक रस्त्यावर मानवी आरोग्यास जीविकास धोका निर्माण होईल अशा प्रकारे उघड्यावर कचरा मलबा किंवा धोकादायक वस्तूची वाहतूक करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांकडून यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
पुयड यांनी केला सेना आमदारांवर आरोप..! या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेल्या एका हायवा ट्रकचे मालक सदानंद पुयड हे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. आमदारांच्या विरोधात गेलं की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. मी समाजासाठी विरोध केला वैयक्तिक रोष नाही. दोन्ही आमदारांनी हे केले असेल तर मला मान्य आहे. आपण समाजाचे काम करणं सोडणार नाही. आमच्या मागे लागाल तर आम्हीही गप्प बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर नांदेड दक्षिणचे आमदार यांच्या गावात झालेल्या एका घटनेत आमच्या संस्थापक अध्यक्षाने तुम्हाला मदत केली होती, हे विसरू नका असा सल्लाही दिला आहे. महापालिकेने जमा केलेली घाण, कचरा माझ्या गाड्यांनी सार्वजनिक ठिकाणाहून बाजूला करत होतो असा खुलासाही सदानंद पुयड यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये केला आहे. त्यामुळे आता या कचरा प्रकरणाला राजकीय रंगही आला आहे.



